पेट्रोल पंपांवर सर्व सुविधा द्या ! – भाजपच्या निवदेनावर जिल्हाधिकारी यांचे आदेश
सांगली, १६ जून – इंधन भरण्यासाठी पंपावर गेल्यास तेथे हवा, पिण्याचे पाणी आणि स्वछतागृह आदी सुविधा मिळत नाहीत. स्वच्छतागृहे अस्वच्छ, नादुरुस्त आणि गैरसोयीची आहेत. काही ठिकाणी कुलूप लाऊन बंद केली आहेत. यामध्ये महिला वाहनधारकांची मोठी कुचंबणा होते. हवा भरण्याची यंत्रे सर्रास ठिकाणी बंद अवस्थेत आहेत. तरी जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर वाहनधारकांना सर्व सुविधा द्या, या मागणीचे निवेदन भाजपने जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना दिले. यानंतर सर्व पंपांवर सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. (वास्तविक या सर्व सुविधा नागरिकांना मिळणे अपेक्षितच आहे. त्या जर नागरिकांना मिळत नव्हत्या, तर जिल्हा प्रशासनाचा पुरवठा विभाग नेमके काय करत होता ? सर्व यंत्रणा हाताशी असणार्या प्रशासनाच्या या गोष्टी का लक्षात येत नाहीत ? त्यासाठी निवेदन का द्यावे लागते ? – संपादक)
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दळणवळण बंदीच्या काळात गॅरेज बंद असल्याने वाहनधारकांना पंपांवरील हवेशिवाय पर्याय नव्हता; मात्र पंपचालकांच्या बेफिकिरीमुळे ही यंत्रे सर्रास बंद पडली होती. यामुळे वाहनधारकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. या वेळी भाजपचे आमदार सुरेश खाडे, भाजप सांस्कृतिक आघाडीचे ओंकार शुक्ल, भाजपचे सरचिटणीस रवीकांत साळुंखे, मोहन व्हनखंडे, रोहित चिवटे, महेश पाटील, प्रशांत कुलकर्णी, मनोज पाटील उपस्थित होते.