आनंदी, निरागस आणि साधनेत साहाय्य करणारी आध्यात्मिक सखी सौ. सायली करंदीकर !
१. प्रथम भेटीतच पूर्वीपासूनची ओळख असल्यासारखे वाटणे
‘देवाने मला रामनाथी आश्रमात सौ. सायली करंदीकर हिच्या समवेत सेवेची संधी दिली. सौ. सायली पोळ्या करण्याची सेवा करते. आमच्या प्रथम भेटीतच ‘तिची आणि माझी फार पूर्वीपासूनची ओळख आहे’, असे मला जाणवले. मला तिच्याशी सहजतेने आणि मोकळेपणाने बोलता येते.
२. इतरांचा विचार करणे
२ अ. कुणाचे मन न दुखावणे : ती निरागस आहे. ती कधीही कुणाचे मन दुखावत नाही. ती ‘सहसाधिकेला सेवा समजली आहे ना ? त्यांना त्यात काही अडचण नाही ना ?’, अशी काळजी घेते.
३. साधिकेला आधी अल्पाहार करायला सांगणे आणि सेवा सुरळीत झाल्यावर स्वतः अल्पाहार करणे
सायली प्रतिदिन सकाळी ६.३० वाजता आश्रमात येते आणि मी ७ वाजता येते. आम्ही दोघी मिळून पोळ्यांची सेवा करतो. मी येईपर्यंत सायली सेवेला आरंभ करते. मी आश्रमात आल्यावर ती मला आधी अल्पाहार करायला पाठवते. अल्पाहार झाल्यावर मी पोळ्यांची सेवा करते. नंतर सेवा सुरळीत झाल्यावर सायली अल्पाहार करायला जाते.
४. साधनेत साहाय्य करणे
अ. मी मधूनमधून तिला ‘साधनेचे प्रयत्न कसे करू ?’, असे विचारते. तेव्हा ती मला सांगते, ‘‘ताई, तू भावजागृतीचे प्रयत्न वाढव.’’ त्या दृष्टीने प्रयत्न केल्यावर मला आनंद मिळतो.
आ. एके दिवशी तिने मला भाववृद्धी होण्यासाठी एक प्रयोग करायला सांगितला. तेव्हा मी सेवा करत असतांनाही माझी पुष्कळ भावजागृती झाली आणि ते भावक्षण मला दिवसभर अनुभवता आले. ते आठवून मला पुष्कळ आनंद होत असे.
५. संतांनी सायलीविषयी काढलेले कौतुकोद्गार
एकदा एका संतांनी मला विचारले, ‘‘आश्रमात तुझी कुणी मैत्रीण झाली कि नाही ?’’ तेव्हा मी त्यांना सांगितले, ‘‘हो. सायली करंदीकर.’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘अरे वा ! छान झाले. मग आनंदी आनंद आहे.’’ देवाने तिच्या माध्यमातून मला आनंद दिला.
६. सौ. सायली करंदीकर हिच्या संदर्भात आलेल्या अनुभूती
अ. तिच्या तोंडवळ्यावर कधीही थकवा जाणवत नाही. त्यामुळे तिच्यासह दिवसभर राहून मलाही थकवा जाणवत नाही.
आ. एकदा मी नामजप करत असतांना ती माझ्या शेजारी येऊन बसली. त्या वेळी माझा कुलदेवतेचा नामजप आतून आपोआप चालू झाला आणि मला हलकेपणा जाणवू लागला.
इ. सायलीच्या वाढदिवसाच्या १० दिवस आधी माझा ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप आपोआपच होत होता.
ई. सायलीने म्हटलेले भजन ऐकल्यावर मला चैतन्य मिळते.
उ. एकदा मला तिच्या रूपात आमच्या कुलदेवतेचे (श्री बीजासनीमातेचे) दर्शन झाले.
ऊ. मला तिच्यात कधी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, तर कधी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा तोंडवळा दिसतो.’
– सौ. रूपाली पाटील, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.४.२०२१)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |