कर्नाळा बँकेतील ठेवीदारांचे पैसे परत मिळेपर्यंत आमचा लढा चालूच राहील ! – प्रशांत ठाकूर, आमदार, भाजप
पनवेल, १६ जून (वार्ता.) – ‘कर्नाळा सहकारी बँक घोटाळा हा ठराविक खात्यांपुरता मर्यादित नसून त्याची पाळेमुळे खोलवर आहेत. या घोटाळ्यामध्ये शेकापचे इतर नेतेही भागीदार आहेत. जोपर्यंत या बँकेतील ठेवीदारांचे पैसे परत मिळत नाहीत, तोपर्यंत आमचा लढा चालूच राहील’, असे प्रतिपादन भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी १६ जून या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले. माजी आमदार विवेक पाटील यांना महाविकास आघाडी सरकारने पाठीशी घातले आहे, अशी टीकाही ठाकूर यांनी केली.
आमदार प्रशांत ठाकूर पुढे म्हणाले की,
१. या प्रकरणी आमदार महेश बालदी, आमदार रवीशेठ पाटील आणि आमदार निरंजन डावखरे यांच्यासह मला विधानसभेच्या पायर्यांवर बसून आंदोलन करावे लागले होते.
२. त्या वेळी सहकार मंत्र्यांनी याविषयी कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते; परंतु ते पाळलेनाही. राज्य सरकारच याविषयी कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचे आमच्या लक्षात आलेे.
३. शेकापचे आमदार बाळाराम पाटील यांच्या नावाने वर्ष २००२ आणि वर्ष २००५ या कालावधीमध्ये ‘ओव्हर ड्राफ्ट’ने पैसे काढण्यात आले आहेत. त्यांचे नाव ६३ जणांच्या सूचीत कुठेच नाही.
४. शेतकरी कामगार पक्षातील नेत्यांनी या भ्रष्टाचाराविषयी एक चकार शब्दही काढलेला नाही. उलट शेकाप आणि महाविकास आघाडी सरकारच्या फलकांवर आजही विवेक पाटील यांचे छायाचित्र आहे.
५. ज्यांनी सर्वसामान्य ठेवीदारांची ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम हडप केली आहे अशांची, तसेच विवेक पाटील यांना पाठीशी घालणारे आणि या अपव्यवहारांमध्ये भागीदार असणारे या सर्वांची सखोल चौकशी व्हावी.