देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. चंद्ररेखा जाखोटिया (वय ६१ वर्षे) यांचे देहावसान
देवद (पनवेल) – येथील सनातनच्या आश्रमातील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. चंद्ररेखा नटवरलाल जाखोटिया (जिजी) (वय ६१ वर्षे) यांचे दीर्घ आजाराने १६ जून या दिवशी सकाळी ११.५५ वाजता निधन झाले. गेली ११ वर्षे त्या देवद आश्रमात आणि त्यापूर्वी २ वर्षे मिरज येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधनारत होत्या. हिंदु जनजागृती समितीचे राजस्थान आणि मध्यप्रदेश राज्यांचे समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले आणि एक सून असा परिवार आहे. त्यांचे पती श्री. नटवरलाल जाखोटिया हे देवद आश्रमातील सात्त्विक उत्पादनांशी संबंधित, तर त्यांचे ज्येष्ठ पुत्र श्री. संपत जाखोटिया हे दैनिक ‘सनातन प्रभात’ आणि त्याचे संकेतस्थळ यांच्याशी संबंधित सेवा करतात. त्यांच्या स्नुषा सौ. प्रीती जाखोटिया या देहली येथील सनातनच्या सेवाकेंद्रात सेवा करतात. त्यांचे संपूर्ण कुटुंब पूर्णवेळ सेवारत आहे.
गेली १३ हून अधिक वर्षे अंथरुणाला खिळून असूनही सौ. जाखोटिया अनुभूतींचे संकलन आणि भ्रमणभाषवरून जनसंपर्क करणे या सेवा करत होत्या. अत्यंत वेदनादायी स्थितीतही साधनारत राहून आणि मनोभावे सेवा करून त्यांनी ६४ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली होती. गेली २४ वर्षे त्या सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करत होत्या.
सौ. चंद्ररेेखा जाखोटिया यांच्या आई श्रीमती मथुराबाई राठी, दीर श्री. सुरेश जाखोटिया, जाऊबाई सौ. विद्या जाखोटिया आणि पुतण्या श्री. सुयोग जाखोटिया हे सर्व जण सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करतात. तसेच सौ. जाखोटिया यांची एक भावजय आणि सुनेच्या माहेरचे कुटुंबीयही साधनारत आहेत. सनातन परिवार जाखोटिया आणि राठी कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.