गुन्हेगारांना तडीपार करण्याची प्रक्रिया धिम्या गतीने चालत असल्याने गुन्हेगार गुन्हे करण्यामध्ये सक्रीय असल्याचे उघड
|
मडगाव, १५ जून (वार्ता.) – चालू वर्षाच्या प्रारंभी फातोर्डा येथे झालेल्या टोळीयुद्धात बंदूक आणि धारदार शस्त्रे यांचा वापर झाला होता. या घटनेवरून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुन्हेगारांच्या विरोधात कठोर कारवाई करणार असल्याची चेतावणी दिली होती, तसेच गुन्हेगारांना ६ मासांच्या आत तडीपार करणार असल्याचे म्हटले होते. तळावली, नावेली येथील एका व्यक्तीवर मडगाव शहर परिसरात झालेल्या कोयता आणि लोखंडी सळी यांनी झालेल्या आक्रमणाच्या प्रकरणी ‘सार्वजनिक शांती भंग करणार्या गुंडांना तडीपार करणे, हा खरोखरंच उपाय होऊ शकतो का ?’, असा प्रश्न सूज्ञ नागरिकांना पडला आहे.
अनेक गुन्हेगारांच्या विरोधात तडीपार करण्याची प्रक्रिया चालू आहे; मात्र ही प्रक्रिया पूर्ण होण्यास विलंब लागत असल्याने मध्यंतरीच्या काळात संबंधित गुन्हेगार गुन्हेगारी जगात सक्रीय असल्याचे दिसून आले आहे. मडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत तडीपार करण्यासंबंधी एकूण ९ प्रकरणे गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहेत. फातोर्डा पोलीस ठाण्यातही अशाच प्रकारची प्रकरणे जलद मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रलंबित आहेत. पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकार्याच्या मते गुन्हेगाराच्या विरोधातील तडीपारीचे प्रकरण समयमर्यादेत मार्गी लागल्यासच या प्रक्रियेचा लाभ होऊ शकतो. ही प्रकरणे मार्गी लागण्यास विलंब झाल्यास ती प्रकरणे पुढे जुनी वाटू लागतात. यामुळे संबंधित गुन्हेगाराला त्याचा लाभ मिळू शकतो. कोरोना महामारीमुळे गुन्हेगारांना तडीपार करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यास विलंब लागत असल्याचे समजते.