गोव्यात विवाहानंतरच्या हिंसेचे प्रमाण ८ टक्के : अनेक महिलांचा होत आहे छळ !
राष्ट्रीय कौटुंबिक स्वास्थ्यासंदर्भातील ५ व्या सर्वेक्षणातून माहिती उघड
|
पणजी, १५ जून (वार्ता.) – गोवा वैद्यकीय महाविद्यालयातून मूल पळवण्याच्या प्रकरणाला घरगुती हिंसा आणि ‘मुलगा हवा’ असा कुटुंबियांचा दबाव असणे, अशी एक किनार असल्याचे आतापर्यंतच्या पोलीस अन्वेषणातून समोर आले आहे. विवाहानंतर अनेक महिलांना अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गोव्यात डिसेंबर २०१४-१५ मध्ये झालेल्या राष्ट्रीय कौटुंबिक स्वास्थ्यासंदर्भात चौथ्या सर्वेक्षणात गोव्यात १३ टक्के महिलांना विवाहानंतरच्या हिंसेला सामारे जावे लागत असल्याचे म्हटले होते; मात्र डिसेंबर २०२० मध्ये झालेल्या राष्ट्रीय कौटुंबिक स्वास्थ्यासंदर्भातील ५ व्या सर्वेक्षणात गोव्यात विवाहानंतरच्या हिंसेत घट झाल्याचे आणि हे प्रमाण ८ टक्क्यांवर पोहोचल्याचे म्हटले आहे; मात्र महिला आयोग आणि महिला पोलीस यांच्याकडे येणार्या तक्रारी पहाता गोव्यात अनेक महिलांना अशा छळाला सामोरे जावे लागत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
३० ऑगस्ट २०१९ ते २६ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत ५ वे कौटुंबिक स्वास्थ्य सर्वेक्षण करण्यात आले. या वेळी गोव्यातील १ सहस्र ८५६ घरांना भेटी देऊन २ सहस्र ३० महिला आणि ३१३ पुरुष यांच्याकडून माहिती मिळवून अहवाल सिद्ध करण्यात आला. या अहवालात १५ ते ४९ वर्षे वयोगटातील ९३ टक्के महिला, तर ९६.३ टक्के पुरुष साक्षर असल्याची नोंद आहे. साक्षरतेचे प्रमाण मोठे असूनही विवाहानंतर हिंसा होण्याचे प्रमाण अधिक आहे. सर्वेक्षणानुसार गरोदरपणात शारीरिक हिंसेला बळी पडणार्या महिलांचे प्रमाणही १.६ टक्के आहे.