साधिकेने अनुभवलेली परात्पर गुरुदेवांची प्रीती !
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि ‘ज्यामुळे माझ्या जीवनाला एक नवीन कलाटणी मिळाली’, असे अनुभवाचे क्षण मी त्यांच्या कोमल चरणी कृतज्ञतापुष्पांच्या रूपात अर्पण करते. मी गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना करते, ‘त्यांनीच मला सर्व लक्षात आणून माझ्याकडून लिहून घ्यावे.’
१५ जून या दिवशी आपण कु. सुगुणा गुज्जेटी यांची परात्पर गुरुदेवांशी झालेली प्रथम भेट आणि त्यांचा सेवेचा प्रारंभ याविषयी पाहिले. आज अंतिम भाग पाहूया.
भाग २ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/487024.html |
४. मुंबई येथील सेवाकेंद्रात सेवा करण्यासाठी जाणे
४ उ. साधकांच्या साधनेचा आणि त्यांच्या कुटुंबियांचाही विचार करणे : वर्ष १९९९ मध्ये मुंबईत नोकरी करून मी सेवा आणि साधना करत असे. त्या वेळी मी बस मधून ये-जा करायचे. एक दिवस पू. वटकरकाकांनी मला ‘सेकंड हँड’ दुचाकी वाहन घेण्यास सांगितले. ‘केवढ्याला मिळेल’, असे मी त्यांना विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘१० ते १५ सहस्र रुपयांमध्ये मिळेल.’’ त्यानंतर मी अधिकोषातून पैसे आणून श्री. वटकरकाकांना दिले आणि त्यांनाच माझ्यासाठी दुचाकी बघण्यास सांगितले. पू. वटकरकाकांनी याविषयी परात्पर गुरुदेवांना सांगितल्यावर परात्पर गुरुदेव पू. वटकरकाकांना म्हणाले, ‘‘सुगुणा सुटी घेऊन भाग्यनगर येथे जात आहे. तिला मिळणार्या वेतनात कपात होत असेल. तिला घरी पैसे द्यावे लागत असतील. तिने दुचाकी वाहन घेण्यासाठी दिलेले पैसे तिला परत द्या. आपण प्रचार सेवा करणार्या साधकांसाठी पुण्याहून दुचाकी मागवल्या आहेत. सुगुणाला त्यातील एक दुचाकी द्या, म्हणजे तिचा बसने येण्या-जाण्याचा वेळ वाचेल आणि ती सेवा करू शकेल.’’ गुरुदेवांचे हे बोलणे ऐकून माझे मन आणि डोळे भरून आले. परात्पर गुरुदेवांनी माझे जीवन, साधना आणि पालनपोषण यांचे दायित्व घेतले आहे, तसेच ‘मला कोणती अडचण येऊ शकते ?’, हे लक्षात घेऊन माझ्या कुटुंबियांचीही ते काळजी घेत आहेत’, असे मला वाटले.
५. एका संतांनी साधकांना होणार्या अनिष्ट शक्तींच्या त्रासाच्या निवारणासाठी यज्ञ करणे
५ अ. ‘यज्ञाच्या ठिकाणी देवतांचे अस्तित्व कसे जाणवते ?’, याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण होणे : वर्ष २००२ मध्ये पूर्णवेळ साधक होऊन प्रसारासाठी मी भाग्यनगर येथे रहात होते. मी मुंबईला आल्यावर सेवाकेंद्रात जात असे. तेव्हा मी परात्पर गुरुदेवांना प्रचाराच्या वेळी निर्माण होणारे प्रश्न आणि साधना यांविषयी विचारत असे. त्याच काळात एक संत साधकांना होणार्या अनिष्ट शक्तींच्या त्रासाच्या निवारणासाठी यज्ञ करायचे. साप्ताहिक ‘सनातन प्रभात’मध्ये त्याविषयी माहिती येत असे. ते संत यज्ञ करत असतांना देवता यज्ञकुंडाजवळ येत असल्याचे वाचनात आले. ‘यज्ञाच्या ठिकाणी देवता कशा येतात ?’, याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता माझ्या मनात निर्माण झाली.
५ आ. ‘ईश्वर कधी दिसेल ?’, असे परात्पर गुरुदेवांना विचारणे : मी परात्पर गुरुदेवांना विचारले, ‘‘ते संत यज्ञ करतांना देव खरेच येतो का ? आता मी ज्याप्रमाणे तुम्हाला बघू शकत आहे, तसेच ते डोळ्यांना दिसतात का ?’’ तेव्हा परात्पर गुरुदेव म्हणाले, ‘‘हो. ज्या वेळी आपल्यात भाववृद्धी होते, त्या वेळी ईश्वर आपल्याला दिसतो. ते संत लहानपणापासूनच त्या देवाची भक्ती करत आहेत. आज त्यांचे वय ८० वर्षे आहे. इतकी वर्षे भक्ती केल्यानंतर त्यांच्यात भाव निर्माण झाल्याने आता त्यांना देव प्रत्यक्ष दिसतो.’’ ‘मला ईश्वर कधी दिसणार ?’, असे मी परात्पर गुरुदेवांना विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘३० वर्षांच्या आत तुमच्यात भाववृद्धी होईल आणि तुम्हाला ईश्वर दिसेल.’’ त्यांचे हे बोलणे ऐकून मला पुष्कळ आनंद झाला. त्या वेळी ‘भाव म्हणजे काय ?’, हे मला ठाऊक नव्हते. मी परात्पर गुरुदेवांना नमस्कार केला. त्या वेळी माझ्या मनात विचार आला, ‘हे गुरुदेवा, आपण माझ्याकडून जीवनभर अध्यात्माचा प्रसार करण्याची सेवा करवून घ्या.’ मी हे मनातल्या मनात बोलले होते. त्याच वेळी परात्पर गुरुदेव म्हणाले, ‘‘यालाच ‘भाव’ असे म्हणतात.’’ त्या वेळी मला ‘भाव म्हणजे काय ?’, हे लक्षात आले.
(समाप्त)
– कु. सुगुणा गुज्जेटी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |