जालना येथे महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी अधिवक्ता आणि अधिकोष व्यवस्थापकासह अन्य तिघांवर गुन्हा नोंद !
सामान्यांना अशा प्रकारे फसवणार्यांकडून ही रक्कम वसूल करून घ्यायला हवी !
जालना – येथील व्यापारी महिला विजया भाले यांच्या नावावर खोटे कर्ज दाखवून त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी आधुनिक वैद्य वसंत चौगुले, त्यांचे जावई महेश साळगावकर, मुलगी वैशाली साळगावकर, अधिवक्ता रत्नाकर देशमुख आणि आयडीबीआय बँकेचे माजी व्यवस्थापक धनराज मानकर या ५ जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
१. विजया भाले यांचे कापड दुकान जेथे होते, ती जागा आधुनिक वैद्य वसंत चौगुले यांच्या मालकीची होती. भाले यांनी ती भाडेतत्त्वावर घेतली होती.
२. काही दिवसांनी चौगुले यांनी जागा सोडण्यासाठी भाले यांच्याकडे तगादा लावला; परंतु दुकान चांगले चालत असल्यामुळे भाले यांनी दुकान सोडण्यास नकार दिला.
३. चौगुले यांनी वर्ष २००५ मध्ये भाले यांच्याविरुद्ध न्यायालयात दिवाणी दावा प्रविष्ट केला. त्याचा निकाल भाले यांच्या विरोधात गेला. भाले यांनी पुन्हा निकालाच्या विरुद्ध उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ संभाजीनगर येथे अपील प्रविष्ट केले. त्याचा निकाल अद्याप बाकी आहे.
४. आधुनिक वैद्य चौगुले आणि साळगावकर दाम्पत्य यांनी अधिवक्ता देशमुख यांच्या साहाय्याने भाले यांची खोटी स्वाक्षरी वापरून आयडीबीआय बँकेतील कर्ज वाढवून २ लाख ५६ सहस्र ४३७ सहस्र रुपये घेतले आहेत, असे दाखवले. प्रत्यक्षात भाले यांनी एवढे कर्ज घेतले नव्हते. कर्जाची परतफेड न केल्यामुळे अधिकोषाने न्यायालयात दावा प्रविष्ट केला. न्यायालयाची नोटीस भाले यांना मिळाल्यानंतर त्यांनी सर्व प्रकरणाचा छडा लावून आरोपींच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली.