तरुण पिढी ‘व्हाईटनर’च्या विळख्यात !
दळणवळण बंदीच्या काळात ‘व्हाईटनर’चे व्यसन करणार्या तरुणांची संख्या वाढत आहे. यात मुख्यत्वेकरून अल्पवयीन मुले आणि महाविद्यालयीन तरुण यांचा समावेश अधिक आहे. ही नशा हातरुमालावर ‘व्हाईटनर’ लावून त्यातून येणार्या उग्र वासातून करण्याचे प्रमाण वाढले आहे. तरुणांच्या आरोग्यासाठी ही नशा घातक ठरत आहे. व्हाईटनरमध्ये ‘डायक्लोरो इथिलीन’ आणि ‘बेंझिन’ यांचे प्रमाण असल्याने त्यांचा उग्र वास येतो. व्हाईटनरची नशा ५ ते ८ घंटे राहू शकते. या नशेमुळे तरुणांचे मानसिक संतुलन बिघडणे, झोप न येणे, बेशुद्ध पडणे, हृदयविकाराचा झटका येणे आदी आजार उद्भवू शकतात. त्याही पुढे जाऊन ‘नेलपेंट’च्या (नखांना लावायचा रासायनिक रंग) माध्यमातूनही नशा केली जात आहे. हे पदार्थ सध्या छुप्या पद्धतीने तरुणांना उपलब्ध होत आहेत.
पूर्वी केवळ मद्यपान, विडी, गांजा यांच्या पुरतेच मर्यादित असणारे युवक आता आधुनिक काळात ई-सिगारेट, व्हाईटनर, ब्राऊन शुगर, अफिम अशा तत्सम नशायुक्त पदार्थांपर्यंत पोचले आहेत. आजच्या काळात तरुणांमध्ये व्यसन म्हणजे प्रतिष्ठेचे लक्षण बनले आहे. यातील धक्कादायक म्हणजे १५ वर्षांखालील शालेय विद्यार्थीही या पदार्थांचे सेवन करतांना आढळून येतात. अमली पदार्थ जर वेळेवर मिळाले नाही, तर ही मुले निराश होणे, कधी हिंसक, तर कधी आत्महत्येसारखे पराकोटीचे पाऊलही उचलतात. सध्याच्या स्पर्धेच्या काळात वाढत्या तणावाला सामोरे जाण्यासाठी प्रारंभी कुतूहलापोटी घेतलेले अमली पदार्थ पुढे जीवनाचा अविभाज्य भाग बनतात. यामध्ये तरुणांच्या खांद्याला खांदा लावून युवतीही मद्यपान करणे, सिगारेट पिणे यात आघाडीवर आहेत, हे अत्यंत लाजिरवाणे आणि गंभीर आहे.
तरुणांनी व्यसनाधीन होण्यामध्ये त्यांच्या पुढे योग्य आदर्श नसणे, मानसिक दुबळेपणा आणि महत्त्वाचे म्हणजे जीवनात येणार्या तणावाच्या प्रसंगांना सामोरे कसे जायचे ? याचे कोणतेच शिक्षण अभ्यासक्रमात अंतर्भूत नसणे, हे आहे. मुलांच्या पौगंडावस्थेत पालकांनी त्यांच्याशी संवाद वाढवणे आणि त्यांच्यावर लक्ष ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. तरुण पिढी देशाचे पुढचे भवितव्य आहे. हीच पिढी व्यसनाधीन झाली, तर देशाचे भविष्य कसे असेल ? त्यामुळे शासन, प्रशासन आणि पालक यांनी अधिक दायित्व घेऊन तरुण पिढी व्यसनापासून कशी दूर राहील, हे पहाणे आवश्यक आहे !
– श्री. अजय केळकर, सांगली