कोरोनाचा संसर्ग वाढण्यास कारणीभूत ठरणार्यांवर कारवाई व्हावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट !
-
जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांची माहिती
-
नियम मोडणार्यांना ५ सहस्र रुपये दंड किंवा १५ दिवसांचा कारावास देण्याची मागणी
सावंतवाडी – सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोनाच्या संसर्गाकडे दुर्लक्ष करून ही परिस्थिती निर्माण होण्यास कारणीभूत ठरणार्यांवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट केल्याचे येथील सामाजिक कार्यकर्ते तथा जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी सांगितले. मास्क न वापरणार्या, तसेच प्रशासनाचे नियम मोडणार्या नागरिकांना ५ सहस्र रुपये दंड किंवा १५ दिवसांच्या कारावासाची शिक्षा देण्यात यावी. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी काही कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे. जनहित याचिकेद्वारे त्यावर प्रकाश टाकण्यात आला असून वाढत्या रुग्णसंख्येवर आळा घालण्यासाठी सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आल्याचे मसुरकर यांनी सांगितले. (स्वातंत्र्यानंतर जनतेला समाज आणि राष्ट्र यांप्रतीच्या कर्तव्याची शिकवण न दिल्याने आपत्कालीन परिस्थितीतही काही जण दायित्वशून्यतेने वागत आहेत. आगामी आपत्काळात जनता अशीच वागल्यास परिस्थिती नियंत्रणात ठेवणे सरकारला कठीण जाणार आहे. त्यामुळे आतातरी सरकारने जनतेला कर्तव्याची जाणीव करून देणे आवश्यक आहे ! – संपादक)