देशात सोन्याच्या दागिन्यांवरील ‘हॉलमार्किंग’चा नियम लागू !
सराफ व्यावसायिकांना ‘हॉलमार्क’ असलेले सोन्याचे दागिनेच विकता येणार !
नवी देहली – सोन्याच्या दागिन्यांवर ‘हॉलमार्किंग’ असणे १५ जूनपासून बंधनकारक करण्यात आले आहे. १४, १८ आणि २२ कॅरेटच्या सोन्याच्या दागिन्यांवर ‘हॉलमार्क’ असेल, तरच त्यांची विक्री करता येईल. अन्यथा संबंधित सराफ व्यावसायिकाला दागिन्याच्या मूल्याच्या पाचपट दंड अथवा एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. हॉलमार्किंगसाठीची नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन स्वरूपातही उपलब्ध करून देण्यात आली आहे. हॉलमार्किंगमुळे ग्राहकांची फसवणूक न होता त्यांना शुद्ध सोने मिळेल.
सध्या देशातील ४० टक्के सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क असतो. भारतात अंदाजे ४ लाख सराफ व्यावसायिक (ज्वेलर्स) आहेत. यांपैकी केवळ ३५ सहस्र ८७९ व्यावसायिकच भारतीय मानक कार्यालयाकडून (‘बी.आय.एस्.’कडून) प्रमाणित आहेत.
Hallmarking on gold jewellery and related items is set to become mandatory from today
Here’s all you need to know https://t.co/ssNkt3iEJm
— Hindustan Times (@htTweets) June 15, 2021
‘हॉलमार्किंग’ म्हणजे काय ?
सोने, चांदी आणि प्लॅॅटिनम यांच्या शुद्धतेचे प्रमाणीकरण करण्याचे एक साधन म्हणजे हॉलमार्किंग. हॉलमार्किंगची संपूर्ण प्रक्रिया देशभरातील हॉलमार्किंग केंद्रांवर केली जाते. त्याचे निरीक्षण भारतीय मानक कार्यालयाद्वारे (‘बी.आय.एस्.’द्वारे) केले जाते. ‘जर दागिन्यांवर हॉलमार्क असेल, तर ते शुद्ध आहे’, असे प्रमाणित केले जाते. त्यामुळे सोने खरेदी करण्यापूर्वी त्यावर ‘बी.आय.एस्.’चा हॉलमार्क आहे कि नाही, याची निश्चिती करणे आवश्यक आहे. भारतीय मानक कार्यालयाचे मूळ हॉलमार्क त्रिकोणी आकाराचे आहे. त्यावर हॉलमार्किंग केंद्राच्या लोगोसह सोन्याची शुद्धताही लिहिलेली असते. तसेच त्यावर त्या दागिन्यांच्या उत्पादनाचे वर्ष आणि निर्मात्याचा लोगोही असतो.