युरोप, अमेरिका आणि चीन यांच्यामुळे जगाला हवामान पालटाच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे ! – भारत
गेल्या २०० वर्षांत हवामान पालटात भारताचा केवळ ३ टक्के वाटा !
नवी देहली – गेल्या २०० वर्षांत विशेषत: युरोप, अमेरिका यांनी, तर मागील ४० वर्षांत चीनने केलेल्या कार्बन उत्सर्जनामुळे हवामान पालटाच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे; मात्र याच २०० वर्षांत हवामान पालटाच्या संकटात भारताचा वाटा ३ टक्के इतकाच आहे, अशी माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी एका कार्यक्रमात दिली. ‘पर्यावरण संमेलन : पुनरुज्जीवन, पुनर्जन्म आणि निसर्ग संवर्धन’ या विषयावर हा ऑनलाईन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
For climate change, rich nations owe us billions: Javadekar https://t.co/hFURgh4fin
— TOI India (@TOIIndiaNews) June 14, 2021
जावडेकर पुढेे म्हणाले की, युरोपमधील देश, तसेच अमेरिका आणि चीन यांसारख्या देशांनी जग आर्थिकदृष्ट्या संपन्न बनवले आहे; परंतु जगाला मोठ्या प्रमाणात प्रदूषित केले आहे. भारत हा असा देश आहे ज्याचा पर्यावरणीय पालटावर सर्वांत अल्प परिणाम झाला आहे. पॅरिस कराराचा भाग म्हणून विकसित देशांनी प्रतिवर्षी विकसनशील देशांना हवामान पालटाचा सामना करण्यास १०० अब्ज डॉलर्स (७ लाख ३३ सहस्र कोटींहून अधिक भारतीय रुपये) देण्याचे आश्वासन दिले होते; मात्र गेल्या ११ वर्षांपासून काहीही झाले नाही. हवामान पालटामुळे विविध नैसर्गिक आपत्ती आणि चक्रीवादळे येत आहेत. यामुळे जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी आणि आपल्या पर्यावरणातील आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी आपण अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे.