उद्योगांना ऑक्सिजनचा पुरवठा पूर्ववत करावा ! – पुणे जिल्ह्यातील उद्योजकांची मागणी
पुणे – एप्रिल-मे या मासांमध्ये पुण्यात प्रतिदिन ३८१ मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी होती. सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने रुग्णालयांची ऑक्सिजनची मागणीही कमी झाली आहे. सध्या ही मागणी १६० मेट्रिक टन एवढी आहे. उद्योगांना लागणारा ऑक्सिजनचा पुरवठा पूर्ववत करण्यासाठी केंद्र सरकारने ४ दिवसांपूर्वीच आदेश दिला आहे. तरी राज्य सरकारचा अन्न आणि औषध प्रशासन विभाग, तसेच आरोग्य विभाग यांच्याकडून अद्याप त्याविषयी प्रक्रिया चालू झालेली नाही. त्यामुळे उपलब्ध होत असलेल्या २० टक्के ऑक्सिजनवर किती दिवस काम करायचे ? असा प्रश्न उद्योजकांनी उपस्थित केला आहे.
दळणवळणबंदीचे निर्बंध शिथिल झाल्याने उद्योगांमध्ये काम वाढू लागले आहे; पण ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने उद्योगांना अडचणी येत आहेत. काही ठिकाणी ऑक्सिजनला पर्याय म्हणून ‘एअर कॉम्प्रेसर’चा वापर होऊ लागला आहे, तरी त्याला मर्यादा आहेत. उद्योगांना अधिक प्रमाणात ऑक्सिजन मिळाल्यास कामांना वेग येईल, असे उद्योजकांचे म्हणणे आहे.