‘गोमेकॉ’त वैद्यकीय कचरा जाळण्याच्या भट्टीच्या क्षमतेपेक्षा अधिक कचरा जमा होतो ! – डॉ. शिवानंद बांदेकर, अधिष्ठाता (डीन), ‘गोमेकॉ’
वैद्यकीय कचरा उघड्यावर अनधिकृतपणे जाळल्याच्या प्रकरणी गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने ‘गोमेकॉ’ला दंड ठोठावल्याचे प्रकरण
पणजी, १४ जून (वार्ता.) – राज्यातील सर्व कोरोना रुग्णालये आणि कोरोना निगा केंद्रे येथील वैद्यकीय (मेडिकल) कचरा गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरातील ‘इन्सिनरेटर’द्वारे (कचरा जाळण्याची भट्टी) विल्हेवाट लावली जाते. ‘गोमेकॉ’तील ‘इन्सिनरेटर’ प्रतिदिन केवळ दीड टन वैद्यकीय कचर्याची विल्हेवाट लावू शकतो; मात्र ‘गोमेकॉ’त प्रतिदिन अडीच टन वैद्यकीय कचरा गोळा होत असतो. यामुळे वैद्यकीय कचरा गोमेकॉच्या परिसरात साठतो. त्यामुळे साठवलेल्या वैद्यकीय कचर्याच्या संदर्भात काही प्रमाणात दुर्घटना घडणे स्वाभाविक आहे, असा दावा ‘गोमेकॉ’चे अधिष्ठाता डॉ. शिवानंद बांदेकर यांनी केला आहे. वैद्यकीय कचरा उघड्यावर अनधिकृतपणे जाळल्याच्या प्रकरणी गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने ‘गोमेकॉ’ला दंड ठोठावला आहे. या पार्श्वभूमीवर अधिष्ठाता डॉ. शिवानंद बांदेकर यांनी हे मत व्यक्त केले. (कचरा अधिक प्रमाणात साठत आहे, तर विल्हेवाट लावण्याची यंत्रे अधिक क्षमतेची घेणे रुग्णालय व्यवस्थापनाला सहज शक्य असते ! असे असूनही अशी उत्तरे देणे, ही दायित्वशून्यता आहे ! या वैद्यकीय कचर्यामुळे कुणाला अपाय झाला, तर त्याचे दायित्व कोण घेणार ? – संपादक)
अधिष्ठाता डॉ. शिवानंद बांदेकर पुढे म्हणाले, ‘‘वैद्यकीय कचरा उघड्यावर अनधिकृतपणे जाळल्याच्या प्रकरणी ‘गोमेकॉ’ने ‘इको क्लिन’ आणि ‘सोडेक्सो’ या आस्थापनांना ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावली आहे. या नोटिसीला दोघांनी उत्तर दिले आहे. हा विषय संबंधित विशेष समितीच्या बैठकीत चर्चेला येणार आहे.’’
गोव्यात ‘ब्लॅक फंगस’मुळे ११ जणांचा मृत्यू !
गोव्यात आतापर्यंत ‘ब्लॅक फंगस’ची एकूण २५ प्रकरणे नोंद झाली आहेत. यामधील ११ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. सद्यःस्थितीत गोव्यात ‘ब्लॅक फंगस’ची लागण झालेल्या १४ रुग्णांवर ‘गोमेकॉ’च्या १०२ वार्डमध्ये उपचार चालू आहेत, अशी माहिती डॉ. शिवानंद बांदेकर यांनी दिली.