सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पर्जन्यवृष्टी
|
सिंधुदुर्ग – जिल्ह्यात १४ जूनला मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे नदी, नाले यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे काही ठिकाणी वाहतूक कोलमडली होती, तर अतीवृष्टीमुळे काही ठिकाणी पडझड झाली आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुढील ५ दिवस पावसाचा जोर असणार असल्याचे प्रशासनाने कळवले आहे.
सावंतवाडी – तालुक्यात काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. काही ठिकाणी शेतीमध्ये पाणी शिरल्याने शेतकर्यांचा खोळंबा झाला आहे. बांदा शहरात पहिल्याच पावसात शहरातील सर्व गटारे तुडुंब भरल्याने शहरातील रस्ते जलमय झाले. बांदा-निमजगा रस्त्यावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद होती. या ठिकाणी असलेल्या लमाणींच्या वस्तीत पाणी शिरल्याने हाहाकार उडाला. पूरप्रवण क्षेत्र असलेल्या भागात अतीदक्षतेची चेतावणी देण्यात आली आहे.
कुडाळ – माणगाव येथील निर्मला नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसरातील २७ गावांचा संपर्क तुटण्याची भिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर नदीच्या काठी असलेल्या ग्रामस्थांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे. ‘कामाशिवाय कुणीही घराबाहेर पडू नये’, असे आवाहन प्रशासन आणि ग्रामपंचायत यांनी केले आहे. माणगाव खोर्यातील नानेली, दुकानवाड येथील अनेक छोटे पूल आणि रस्ते पाण्याखाली गेले आहेत. शिवापूर येथे एक एस्.टी. बस पाण्यामुळे अडकली आहे.
मालवण – तालुक्यातील मसुरे पंचक्रोशीतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. रमाई नदीची पाण्याची पातळी वाढली असून बेळणे-कणकवली मार्गावरील बागायत पुलावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.