५८ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला म्हापसा, गोवा येथील कु. हृषिकेश हर्षद गडेकर (वय १ वर्ष) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. हृषिकेश हर्षद गडेकर एक आहे !

​ज्येष्ठ शुक्ल पक्ष पंचमी (१५.६.२०२१) या दिवशी कु. हृषिकेश हर्षद गडेकर याचा पहिला वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईला गर्भारपणात आणि बाळाच्या जन्मानंतर जाणवलेली सूत्रे अन् त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कु. हृषिकेश हर्षद गडेकर

कु. हृषिकेश गडेकर याला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या ! 

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

१. जन्मापूर्वी

१ अ. गर्भारपणात केलेली साधना

१. ‘गर्भधारणा झाल्यापासून भगवंत आणि श्रीगुरु यांच्या कृपेमुळे मी प्रतिदिन गणपति, मारुति आणि रामरक्षा या स्तोत्रांचे पठण करायचे. त्या वेळी गर्भातील बाळाची हालचाल चालू व्हायची आणि ती स्तोत्रपठण संपेपर्यंत चालू रहायची. ‘जणू बाळ ते ऐकत आहे आणि ते ऐकतांना त्याला आनंद होत आहे’, असे मला वाटायचे.

२. मी प्रतिदिन ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करतांना गर्भ पूर्ण जागृतावस्थेत आहे आणि त्याची हालचाल चालू आहे’, असे मला जाणवायचे. गर्भधारणा झाल्यापासून मला दत्ताचे अधूनमधून स्मरण होऊन सूक्ष्मातून आणि स्वप्नातही दत्तगुरूंचे दर्शन झाले. तेव्हा जणू ‘दत्तगुरूंचा अंशच माझ्या गर्भात आला आहे’, असे मला जाणवायचे.

२. अनुभूती

२ अ. गरोदर असतांना यजमानांसह दुचाकीवरून पडणे, समोर असलेल्या बैलाने आमच्यावर पाय न ठेवता उडी मारून पुढे जाणे आणि पडतांना यजमानांच्या अंगावर पडल्यामुळे फार दुखापत न होणे : गर्भधारणा झाल्यानंतर आरंभीच्या काळात मी आणि माझे यजमान दुचाकीवरून पडलो होतो. त्या वेळी समोर एक बैल होता. त्याने एक पाऊल पुढे टाकले असते, तरी ते आमच्यावर पडले असते; पण त्याने एकदम मोठी उडी घेतली आणि तो मार्गाच्या बाजूने खाली गेला. देवानेच आमचे रक्षण केले. पडतांनाही यजमान खाली आणि त्यांच्यावर मी अशा पद्धतीने पडले. त्यामुळे मला फार दुखापत झाली नाही. ‘बाळाच्या अंतरातील देवाच्या चैतन्यमय अस्तित्वामुळे आमचे आणि बाळाचे रक्षण झाले’, असे मला जाणवले.

२ आ. संतांचे आशीर्वाद मिळणे : आम्ही प्रत्येक गुरुवारी दत्ताच्या देवळात दर्शन घेण्यासाठी जात होतो. एकदा त्या देवळातील संत तिथे उपस्थित असल्याने आम्ही त्यांचा आशीर्वाद घेतला. त्या वेळी त्यांना ‘मी गरोदर आहे’, असे सांगितले. तेव्हा त्यांनी ‘मी बाळाचे नाव ठेवीन’, असे सांगून आशीर्वादरूपी विभूतीचे संरक्षककवच दिले.

२ इ. आश्रमात जाण्याची ओढ वाढणे : गर्भधारणा झाल्यापासून मला सतत आश्रमात जायची ओढ वाटायची. त्या वेळी रामनाथी आश्रमात श्री भवानीदेवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार होती. मला तिथे जाण्याची संधी मिळाली आणि विधीतील अन् देवीचे चैतन्य मला अन् गर्भातील बाळाला ग्रहण करता आले. आश्रमातील एक साधिका मला म्हणाली, ‘‘बाळातील चैतन्यामुळे तुम्हाला आश्रमात येण्याची ओढ लागली आहे.’’ ते ऐकून माझी भावजागृती झाली आणि गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली.

२ ई. श्री भवानीमातेची प्राणप्रतिष्ठापना चालू असतांना तिच्याकडून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्यामुळे देहशुद्धी होऊन ‘देहाभोवती चैतन्याचे वलय निर्माण झाले’, असे जाणवणे : श्री भवानीमातेच्या प्राणप्रतिष्ठापनेचे विधी चालू असतांना देवीचा नामजप करायला सांगितला होता. मी तिथे बसलेे असतांना ‘देवीचे चैतन्य पुष्कळ गतीने आमच्याकडे (मी आणि गर्भातील बाळ यांच्याकडे) येत होते. त्यामुळे आमच्याभोवती चैतन्याचे वलय निर्माण झाले होते. त्या चैतन्याने आमची शुद्धी होत होती.’, असे मला जाणवले. या विधीच्या वेळी मला भावस्थिती अनुभवता आली.

२ उ. नवव्या मासात सेवेची संधी मिळणे : गुरुमाऊलीच्या कृपेने नवव्या मासात मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ‘ऑनलाईन’ जन्मोत्सव सोहळ्यात सेवेची संधी मिळाली. त्यासाठी सेवेसाठी क्षणोक्षणी माझा कृतज्ञताभाव दाटून येत होता. सेवा करतांना ‘मी विष्णुलोकात बाळकृष्णाला घेऊन प्रत्यक्ष भगवंताची सेवा करत आहे’, असा भाव मला जाणवत होता. जन्मोत्सवाच्या दिवशी सकाळपासूनच भरभरून चैतन्य मिळत होते. त्या वेळी ‘प्रसुतीसाठी कधीही रुग्णालयात जावे लागेल’, अशी माझी स्थिती होती. गुरुदेवांनी आमची काळजी घेतली आणि मला जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचा लाभ घेता आला. सोहळ्यात ‘गुरुदेव आणि संत यांची चैतन्यवाणी ऐकतांना पूर्ण देह आणि गर्भातील बाळ यांना आध्यात्मिक लाभ होत आहेत. माझा संपूर्ण देह चैतन्याने भारित झाला आहे. चैतन्याचा स्रोत माझ्या देहाकडे येत आहे आणि माझ्या देहाभोवती चैतन्याचे सोनेरी वलय निर्माण झाले आहे’, असे जाणवून मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. संतांची वाणी ऐकतांना बाळाचा प्रतिसाद प्रकर्षाने जाणवत होता. ‘या क्षणाची बाळ वाट पहात होते’, असे मला जाणवले.

३. प्रसुती

३ अ. प्रसुतीच्या वेळी श्री स्वामी समर्थांचे विराट रूपात दर्शन होणे : आधुनिक वैद्यांनी ‘शस्त्रकर्म करावे लागू शकते’, असे सांगितले; पण मला त्याचा ताण आला नाही. शस्त्रकर्मासाठी जातांना ‘माझ्या समवेत भगवंत आणि गुरुदेव आहेत’, असे मला जाणवत होते. शस्त्रकर्म कक्ष भगवंताच्या चैतन्याने भारित झाला आहे’, असे मला वाटले. मला तिथे दत्ताचे अवतारी रूप श्री स्वामी समर्थ यांचे विराट रूपात दर्शन झाले आणि ‘ते मला आशीर्वाद देत आहेत’, असे जाणवले. मला मुलगा झाला.

४. जन्मानंतर

४ अ. जन्म ते ५ मास

४ अ १. पुरोहितांनी बाळ दत्तभक्त असल्याने त्याला अधूनमधून दत्ताच्या देवळात घेऊन जाण्यास सांगणे : जन्मानंतर ११ व्या दिवशी बाळासाठी होम-विधी करायचे होते. त्या पूर्ण कालावधीत बाळ शांत होते. विधीसाठी आलेल्या पुरोहितांनी जातांना सांगितले, ‘‘हे बाळ दत्त महाराजांचे भक्त आहे. त्याला अधूनमधून दत्ताच्या मंदिरात घेऊन जावे.’’ त्या वेळी मला बाळ गर्भात असतांना दत्ताचा नामजप करतांना बाळाचा प्रतिसाद आठवला आणि कृतज्ञता वाटली.

४ अ २. बाळाला पहाण्यासाठी एक साधक येणे आणि त्याने ‘बाळकृष्ण’, अशी हाक मारल्यावर बाळाने हसून प्रतिसाद देणे : बाळ १५ दिवसांचे असतांना श्री. राजेश कोरगावकर हे साधक बाळाला बघायला आले होते. येण्याअगोदर त्यांनी ‘मी आज बाळकृष्णाच्या भेटीला येणार आहे’, असे कळवले. तेव्हा ‘बाळाला भेटायला आज प्रत्यक्ष गुरुदेव येणार आहेत’, असे मला वाटले. दादा घरी आल्यावर मी बाळाला म्हणाले, ‘‘तुला बघायला परात्पर गुरु डॉक्टर आले आहेत.’’ दादाने ‘बाळकृष्ण’, अशी हाक मारल्यावर बाळ हसले. त्या वेळी मला ‘खरोखरच गुरुदेव आले आहेत’, असे वाटले.

४ अ २ अ. साधकाने बाळाला सरस्वतीदेवी अन् श्रीकृष्ण यांची चित्रे आणि ‘परात्पर गुरु डॉ. आठवले अन् त्यांचे चरण’ ही छायाचित्रे भेट दिल्यावर बाळाने नमस्काराची मुद्रा करणे : बाळाला श्रीकृष्ण अन् सरस्वतीदेवी ही चित्रे आणि प.पू. गुरुदेव अन् त्यांचे चरण’ ही छायाचित्रे भेट देऊन दादा म्हणाले, ‘‘ही भेट बाळाला आवडणार.’ बाळानेही गुरुदेवांच्या छायाचित्राकडे पाहून लगेच नमस्काराची मुद्रा केली. दादाने घरी गेल्यावर भ्रमणभाषवर मला लघुसंदेश पाठवला, ‘बाळाची काळजी घे. तुझे बाळ उच्च कोटीचा साधक आहे’, असे मला वाटते.

४ अ ३. बाळाची जाणवलेली अन्य वैशिष्ट्ये

अ. जन्मापासून बर्‍याच वेळा बाळाच्या बोटांची मुद्रा असते. एरव्हीही त्याची काही कृती चालू असली, तरी त्याच्या बोटांची मुद्रा केलेली असते.

आ. माझी आई बाळाला पहिल्या मासापासून प.पू. बाबा (प.पू. भक्तराज महाराज) आणि देवता यांची भजने ऐकवायची. भजने ऐकतांना बाळ स्थिर असायचे, तर कधी एकदम ध्यानस्थ स्थितीत असल्याचे जाणवायचे. प.पू. बाबा किंवा देवता यांची भजने म्हटल्यावर बाळ शांत झोपायचे. त्याला श्री दत्तगुरु आणि श्रीकृष्ण यांची भजने ऐकायला आवडतात.

४ आ. ६ मास ते १ वर्ष

४ आ १. व्यवस्थितपणा

अ. हृषिकेशला लेखणी हातात धरायला आवडते. तो ती व्यवस्थित धरून वहीवर काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करतो.

४ आ २. सात्त्विकतेची ओढ

अ. तो पुष्कळ वेळ दैनिक ‘सनातन प्रभात’कडे बघत असतो.

आ. अनेक वेळा झोपेत त्याची नमस्काराची मुद्रा असते. सकाळी उठल्यावरही तो नमस्काराची मुद्रा करतो.

इ. माहेरी गेल्यावर माझा भाऊ (बाळाचा मामा) नामजप करत असेल, तेव्हा तो त्याच्याकडे जाण्यास आतुर असतो आणि माळ हातात घेऊन शांत अन् स्थिर बसतो. त्याचा नामजप चालू असेपर्यंत तो त्याच्या समवेत बसतो.

४ आ ३. देवतांची ओढ

अ. माझ्या माहेरच्या घराजवळ श्री सातेरीदेवीचे मंदिर आहे. हृषिकेश ६ मासांचा झाल्यानंतर माझे बाबा त्याला घेऊन बाहेर जायचे. तो मंदिरात जाण्यासाठी आतुर असायचा. देवळात दर्शनासाठी गेल्यावर त्याला फार आनंद व्हायचा. पुढे पुढे तो मंदिरात आणि देवीजवळ जाण्यासाठी हट्ट करायचा.

आ. भजने म्हटल्यावर हृषिकेश टाळ्या वाजवून तालात नाचतो. कधी तो झोपेसाठी किंवा अजून काही कारणासाठी रडू लागल्यास आईने भजने म्हटल्यावर तो रडायचा थांबतो.

इ. त्याला देवतांची चित्रे हातात धरायला फार आवडते आणि ती चित्रे हातात धरल्यावर त्याला फार आनंद होतो.

४ आ ३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी असलेली ओढ

अ. तो दैनिक ‘सनातन प्रभात’मधील प.पू. गुरुदेवांच्या छायाचित्राला हात लावून नमस्कार करतो.

आ. त्याला ‘प.पू. डॉक्टरबाबा कुठे आहेत ?’, असे विचारल्यावर तो लगेच ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथावरील गुरुदेवांच्या छायाचित्राकडे बोट दाखवून नमस्कार करतो.

५. दोष

हट्टीपणा

६. कृतज्ञता  

भगवान श्रीकृष्ण आणि प.पू. गुरुमाऊली, तुमच्या कृपेमुळेच मी हे सर्व अनुभवू शकत आहे. सर्वकाही तुमच्या कृपेनेच घडत आहे. गुरुराया, तुम्ही दिलेल्या बाळकृष्णरूपी बाळाची अनुभवायला मिळलेली भावसुमने तुमच्या चरणी अर्पण करते.’

– सौ. रेषा हर्षद गडेकर, म्हापसा, गोवा. (८.६.२०२१)

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक