साधिकेने अनुभवलेली परात्पर गुरुदेवांची प्रीती !
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि ‘ज्यामुळे माझ्या जीवनाला एक नवीन कलाटणी मिळाली’, असे अनुभवाचे क्षण मी त्यांच्या कोमल चरणी कृतज्ञतापुष्पांच्या रूपात अर्पण करते. मी गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना करते, ‘त्यांनीच मला सर्व लक्षात आणून माझ्याकडून लिहून घ्यावे.’
१४ जून या दिवशी आपण कु. सुगुणा गुज्जेटी यांचा सनातन संस्थेशी संपर्क कसा झाला आणि त्यांची परात्पर गुरुदेवांशी झालेली प्रथम भेट याविषयी पाहिले. आज त्यापुढील भाग पाहूया.
भाग १ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/486616.html
३. परात्पर गुरुदेवांशी झालेली प्रथम भेट
३ इ. परात्पर गुरुदेवांनी मराठी आणि हिंदी या भाषांतील ग्रंथांचे तेलुगु भाषेत भाषांतर करण्याची सेवा करण्यास सांगणे : मी परात्पर गुरुदेवांशी प्रथमच बोलत असतांना त्यांनी मला विचारले, ‘‘तुम्हाला कोणती भाषा येते ?’’ त्या वेळी ‘माझी मातृभाषा तेलुगु आहे आणि मला हिंदी, मराठी अन् काही प्रमाणात इंग्रजी या भाषा येतात’, असे मी त्यांना सांगितले. त्या वेळी ते म्हणाले, ‘‘किती चांगले आहे. मराठी आणि हिंदी या भाषांत ग्रंथ छापले आहेत. त्याचे तुम्ही तेलुगु भाषेत भाषांतर करा. आज दिवस चांगला आहे. आजच आरंभ करा. आता आपले तेलुगु भाषेतही ग्रंथ येतील. एका वर्षात ग्रंथ होतील. नंतर तुमचे लग्न होणार आहे ना ?’’
३ ई. परात्पर गुरुदेवांनी ईश्वराशी जवळीक करण्यास सांगणे : त्या वेळी माझ्या जीवनातील काही कटू प्रसंगामुळे मी लग्न न करण्याचा विचार परात्पर गुरुदेवांजवळ व्यक्त केला. तेव्हा ते काही वेळ शांत बसले. काही वेळानंतर ते म्हणाले, ‘‘तुम्हाला लग्न करायचे नाही ना ? मग नका करू; परंतु ते होण्यासाठी किंवा न होण्यासाठी प्रयत्नही करू नका; कारण जन्म, मृत्यू आणि लग्न हे सर्व प्रारब्धानुसार होते. तुम्ही त्याविषयी विचार करू नका. ईश्वरालाच तुमचा पती माना. तो माझाही पती (मालक) आहे.’’ त्यांच्या या बोलण्याने मला पुष्कळ आनंद मिळाला. परात्पर गुरुदेव माझ्या मनातील गोष्ट बोलले होते.
३ उ. ‘परात्पर गुरुदेव हेच माझे खरे वडील आहेत’, असे वाटणे : मी परात्पर गुरुदेवांना प्रथम पाहिल्यावर ‘माझे खरे वडील, तर हेच आहेत’, असा माझ्या मनात विचार आला. माझ्या जीवनात जो आधार मला पाहिजे होता, तो आधार मला पहिल्या भेटीतच मिळाला होता. माझ्या जीवनात कितीही चढ-उतार किंवा दुःख आले, तरीही परात्पर गुरुदेवांचे चरण सोडून कुठेही न जाण्याचा मी दृढ निश्चय केला.
४. मुंबई येथील सेवाकेंद्रात सेवा करण्यासाठी जाणे
४ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची साधकांवर असलेली मातृवत प्रीती पाहून मन भरून येणे
४ अ १. ‘साधिकेला कोणताही त्रास होऊ नये’, याची काळजी घेणे : एक दिवस मी रुग्णालयात परिचारिकेची सेवा केल्यानंतर मुंबई येथील सेवाकेंद्रात सेवेसाठी गेले. तेव्हा तेथे असलेल्या सर्व संगणकावर साधक सेवा करत असल्याने माझ्यासाठी एकही संगणक उपलब्ध नव्हता. परात्पर गुरुदेवांनी मला निरोप पाठवला, ‘सुगुणाला रात्री १२ वाजेपर्यंत झोपायला सांगा. १२ वाजेपर्यंत अन्य साधकांची सेवा संपल्यावर ती उठून सेवा करील.’
४ अ २. साधिकेला झोप येत नसल्याचे सूक्ष्मातून जाणून तिला लघुग्रंथात सुधारणा करण्याची सेवा करण्यास सांगणे आणि परात्पर गुरुदेवांच्या अस्तित्वामुळे अन्य वेळेपेक्षा ही सेवा गतीने पूर्ण होणे : मी झोपण्याचा प्रयत्न करत असूनही मला झोप येत नव्हती; म्हणून मी अंथरूणात उठून बसून राहिले. परात्पर गुरुदेवांनी १० मिनिटांनी निरोप पाठवला, ‘सुगुणाला झोप येत नाही, तर तिला तेलुगु लघुग्रंथात सुधारणा करण्यासाठी बोलवा.’ मला झोप येत नसल्याचे गुरुदेवांना कुणीही सांगितले नव्हते. ‘गुरुदेव बाजूच्या ‘फ्लॅट’मध्ये असूनही मला झोप येत नसल्याचे त्यांना कसे कळले ?’, असे मला वाटले. मी गुरुदेवांच्या ‘फ्लॅट’मध्ये गेले. त्या वेळी श्री. अशोक जाधवदादा गुरुदेवांच्या समोर बसून ‘बॅनर’ची सेवा करत होते आणि गुरुदेव सुखासनावर बसून लिखाण करत होते. मला बघून ते म्हणाले, ‘‘तुला झोप येत नाही, तर सेवा करू शकतेस ना ?’’त्यानंतर मी सेवा करू लागले. माझी सेवा १५ ते २० मिनिटांत पूर्ण झाली. त्या वेळी लघुग्रंथात सुधारणा करण्याची गती अन्य वेळेपेक्षा पुष्कळ अधिक असल्याचे माझ्या लक्षात आले. मला शब्द आणि वाक्यरचना पटापट सुचत होती. त्या वेळी वाटले, ‘लघुग्रंथात सुधारणा करण्याची सेवा मी करत नसून ती परात्पर गुरुदेवांच्या अस्तित्वामुळे होत आहे.’
४ आ. रात्री उशिरापर्यंत सेवा करणार्या साधकांना भूक लागल्यास त्यांच्यासाठी खाऊची व्यवस्था करणे : एक दिवस मी तेलुगु ग्रंथांसंबंधी तातडीची सेवा रात्री उशिरापर्यंत जागून करत होते. मी रात्री प्रसाधनगृहात जाण्यासाठी बाहेर पडल्यावर मला परात्पर गुरुदेव दोन्ही हातांत खाऊचे डबे, पाण्याच्या बाटल्या, ताटल्या आणि चमचे असे साहित्य घेऊन बाहेर पडतांना दिसले. मी लगेचच त्यांच्याजवळ जाऊन त्यांना खाऊचे डबे माझ्याकडे देण्यासाठी सांगितले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘ साधक रात्रभर जागून सेवा करतात. त्यांना रात्री भूक लागल्यास ते हा खाऊ खातील आणि सेवाही करतील.’’ तेव्हा ‘गुरुदेवांना साधकांप्रती किती प्रेम आहे ! त्यांच्या मनात साधक आणि त्यांची सेवा या विचारांविना अजून कोणताही विचार नसतो. मलाही साधकांची अशा प्रकारे सेवा करायची आहे’, अशी प्रेरणा त्यांच्याकडून मिळाली.
४ इ. साधिकेच्या मनातील इच्छा जाणून तिला भेटण्यासाठी बाहेर येणे : एकदा मी सेवाकेंद्रात सेवेसाठी गेले असतांना परात्पर गुरुदेव पू. शिवाजी वटकरकाकांशी सेवेसंदर्भात बोलत होते. माझी सेवा झाल्यावर परात्पर गुरुदेवांचे दर्शन घेऊन जावे; म्हणून मी त्या ठिकाणी गेले. ते बराच वेळ बोलत होते. मला त्यांच्या बोलण्यात व्यत्यय आणायचा नसल्याने परात्पर गुरुदेव बाहेर येण्याची वाट बघत मी १५ ते २० मिनिटे दाराबाहेर उभी होते. ते बराच वेळ बाहेर न आल्याने ‘त्यांना बाहेरूनच मानस नमस्कार करून जावे’, असा विचार करून मी नमस्कार करायला लागले. त्या वेळी परात्पर गुरुदेव लगेचच बाहेर आले आणि माझ्याशी बोलले. परात्पर गुरुदेवांनी सूक्ष्मातून माझ्या मनातील इच्छा जाणून ‘मला दर्शन देण्यासाठी ते बाहेर आले’, असे मला वाटले.
(क्रमश: उद्याच्या अंकात)
– कु. सुगुणा गुज्जेटी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.५.२०१८)
भाग ३ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/487237.html |
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |