वैजापूर (संभाजीनगर) येथे अश्लील संदेश पाठवल्याप्रकरणी गटविकास अधिकार्याला मारहाण !
नैतिकता सोडलेल्या अशा शासकीय अधिकार्यांना बडतर्फ करावे !
वैजापूर – जिल्ह्यातील खुलताबाद येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. ज्ञानोबा मोकाटे यांना भ्रमणभाषवरून अश्लील संदेश पाठवल्याच्या कारणावरून त्यांच्या कार्यालयात एका दांपत्याकडून मारहाण करण्यात आली. दांपत्याने दालनाचा दरवाजा आतून बंद करून स्क्रू ड्रायव्हर आणि कटरने मारहाण केली. मोकाटे यांनी आरडाओरड केल्याने इतर कर्मचारी आणि सदस्य यांनी दालनाचा दरवाजा तोडून त्यांची सुटका केली. या घटनेनंतर पंचायत समितीच्या आवारात लोकांची मोठी गर्दी जमली होती.
घायाळ झालेल्या मोकाटे यांना लोकांनी रुग्णालयात उपचारासाठी नेले. या घटनेची सायंकाळपर्यंत पोलीस ठाण्यात कुणीच तक्रार केली नाही. मारहाण करणारे दांपत्य मूळचे लातूर जिल्ह्यातील रहिवासी असून खुलताबाद येथील पंचायत समितीत कंत्राटी पद्धतीवर नोकरी करत आहेत. या आक्रमणामागे ‘भ्रमणभाषवर पाठवलेल्या अश्लील संदेशाचे मूळ कारण असल्याची प्राथमिक माहिती आहे’, अशी माहिती पोलिसांनी दिली.