मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्याप्रकरणी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांचे स्पष्टीकरण !
घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवरील उड्डाणपुलाला सुफी संत मोईनुद्दीन चिश्ती यांचे नाव देण्याचे प्रकरण
मुंबई – लोकप्रतिनिधी या नात्याने जनतेच्या विविध प्रकारच्या मागण्या सरकारपर्यंत पोचवणे माझे कर्तव्य आहे. घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवरील उड्डाणपुलाच्या नामकरणाविषयीही तेथील स्थानिकांची मागणी केवळ सरकारपर्यंत पोचवण्याचे काम मी केले, असे स्पष्टीकरण शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी दिले आहे. या मार्गाला सुफी संत मोईनुद्दीन चिश्ती यांचे नाव देण्यासाठी राहुल शेवाळे यांनी १० जून या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. या मागणीवरून सामाजिक प्रसिद्धीमाध्यमांत धर्मप्रेमी हिंदूंकडून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली.
यावर स्पष्टीकरण देतांना खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटले आहे की, खासदार मनोज कोटक यांनी ‘या उड्डाणपुलाचे नामकरण ‘छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल’, असे करण्याची मागणी मागील वर्षी केली होती’, असे म्हटले आहे. याविषयी मी अनभिज्ञ होतो. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्यदैवत आहे. त्यांच्या नावाला कोणताही विरोध करण्याचा प्रश्नच नाही. स्थानिक नगरसेवक विठ्ठलजी लोकरे यांनी ‘या उड्डाणपुलाला ‘वीर क्रांतीकारक वस्ताद लहुजी साळवे’ यांचे नाव द्यावे’, अशी मागणी यापूर्वीच केलेली आहे. काही लोकप्रतिनिधींनी ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे’ यांचे नाव उड्डाणपुलासाठी सुचवले आहे; मात्र यापैकी कुणाचाही प्रस्ताव माझ्याकडे न आल्याने मला माहिती नव्हती. या सर्व महापुरुषांविषयी मला नितांत आदर आहे. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून बाळकडू मिळालेल्या आम्हाला हिंदुत्व म्हणजे काय ? हे कुणाकडून नव्याने शिकण्याची आवश्यकता नाही. काही राजकारणी केवळ स्वार्थासाठी या प्रकरणाला धार्मिक रंग देऊन अतिशय हीन राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत, ही खेदाची गोष्ट आहे. जनता या स्वार्थी राजकारणाला बळी पडणार नाही.