आनंदी, प्रेमळ आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा असलेल्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेल्या कै. (श्रीमती) ताईबाई लक्ष्मणराव कोंगरे

आनंदी, प्रेमळ आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा असलेल्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेल्या राजुरा (जि. चंद्रपूर) येथील कै. (श्रीमती) ताईबाई लक्ष्मणराव कोंगरे (वय ८० वर्षे) !

‘राजुरा (जि. चंद्रपूर) येथील सनातनचे साधक श्री. विनोद कोंगरे यांच्या आई श्रीमती ताईबाई लक्ष्मणराव कोंगरे (वय ८० वर्षे) यांचे २.५.२०२१ या दिवशी सायंकाळी ५.४० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्याविषयी श्री. विनोद कोंगरे आणि अन्य साधक यांना जाणवलेली सूत्रे दिली आहेत.

कै. (श्रीमती) ताईबाई कोंगरे

१. श्री. विनोद कोंगरे कै. (श्रीमती) ताईबाई लक्ष्मणराव कोंगरे यांचा मुलगा), राजुरा, चंद्रपूर.

१ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर पुष्कळ श्रद्धा असणे : ‘आई प्रतिदिन पहाटे ५ वाजता उठत असे. सकाळी चहा घेणे, फिरून येणे आणि नंतर अंघोळ करून नियमित १२ अभंग म्हणून देवाची आरती करत असे. आमच्या घरी प्रतिदिन अंघोळ करूनच स्वयंपाक करण्याची सवय होती. आई स्वतः तिच्या प्रकृतीची चांगली काळजी घेत होती. तिची परम पूज्य गुरुमाऊलीवर पुष्कळ श्रद्धा होती. त्यांचा प्रत्येक कार्यक्रम ती आवडीने पहात असे. सद्गुरु आणि संत आमच्या घरी यायचे, तेव्हा ती त्यांचा सत्संगही शांतपणे ऐकत होती. सर्व साधकांशी प्रेमाने बोलत असे.

१ आ. पुष्कळ शारीरिक त्रास होत असतांना सर्वत्र देव असल्याची अनुभूती येणे : १३.१२.२०२० या दिवशी आईला श्‍वास घेण्याचा त्रास होऊन छातीमध्ये दुखत होते. त्यामुळे तिला डॉ. कुबेर हॉस्पिटल, चंद्रपूर येथेे भरती केले. तेथे तिला अतीदक्षता विभागात ‘व्हेंटिलेटर’वर ठेवण्यात आले. दोन दिवसांनी ती थोडी सर्वसाधारण स्थितीला आली. रुग्णालयात ८ दिवस राहिल्यावर तिला घरची ओढ लागली. तेव्हा वैद्यांना विचारून तिला ९ दिवसांनी घरी आणले. तेव्हापासून ती अंथरूणावरच होती. तिला त्रास व्हायचा, त्या वेळी ती सांगायची, ‘‘मला महाराजांचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) तीर्थ करून दे.’’ आईला जो काही त्रास होत असे, तो मी पू. अशोक पात्रीकरकाका आणि सौ. मंदाकिनी डगवार यांना सांगत असे. तेव्हा त्यांनी जे मंत्र सांगितले होते, ते म्हणून त्या मंत्रांनी भारित झालेले पाणी तिला देत होतो. तिला ते मंत्र कानामध्ये ऐकवत होतो. तेव्हा तिचा त्रास न्यून होत असे. मी तिला गायत्रीमंत्राने भारित केलेले पाणीही देत असे.

ती नेहमी म्हणायची, ‘‘माझ्या डोक्याकडे कृष्ण आहे. माझ्या डाव्या बाजूला गणपति आहे. माझ्यासभोवती देवच देव आहेत. देव मला काहीपण होऊ देणार नाही.’’ जेव्हा तिला त्रास व्हायचा, तेव्हा ती मोठ्याने नामजप करायची. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ग्रंथ तिच्या अंथरूणावर ठेवला होता. त्या ग्रंथाला हात लावून ती म्हणायची, ‘देवा, मला बरे कर.’

१ इ. आई नेहमी कापराचे उपाय करत असे आणि ती तिच्या पिशवीमध्ये नेहमी श्रीकृष्णाचे चित्र ठेवत असे.

१ ई. निधनानंतर तोंडवळ्यावर पुष्कळ चैतन्य जाणवून आनंदी दिसणे : २.५.२०२१ या दिवशी तिने परात्पर गुरु डॉक्टरांच्या जन्मसोहळ्याच्या निमित्ताने दाखवण्यात आलेला कार्यक्रम शांतपणे ऐकला. कार्यक्रम संपल्यावर तिचा श्‍वास न्यून होत गेला आणि तिने ५.४० वाजता प्राण सोडला. आई जातांना म्हणाली, ‘‘कुणी कोणाचे नाही.’’

निधनानंतर तिच्या तोंडवळ्यावर पुष्कळ चैतन्य जाणवत होते आणि ती आनंदी दिसत होती. सकाळपर्यंत तिचा मृतदेह कडक झाला नव्हता. परम पूज्य गुरुमाऊलींनी सर्वांना दुःख सहन करण्याची शक्ती देऊन आनंदी ठेवले; म्हणून आम्ही गुरुमाऊलीच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.’

२. चंद्रपूर येथील साधक

२ अ. सौ. विजया भोळे

२ अ १. आजींचे आतून गुरुस्मरण चालू असल्याचे जाणवणे : ‘आजींकडे पाहिल्यावर पुष्कळ आनंद जाणवत होता. आजी या वयातही पुष्कळ उत्साही आणि आनंदी जाणवत होत्या. राजुरा येथे हिंदु जनजागृती समितीची सभा होती. तेव्हा मला आजींना भेटण्याचा योग आला. त्या वेळी ‘त्यांची परात्पर गुरु डॉक्टरांवर श्रद्धा असून आतून ‘गुरूंचे स्मरण करत होत्या’, असे जाणवत होते. आजींकडे पाहिल्यावर शिस्त, स्पष्टवक्तेपणा, वक्तशीरपणा आणि कर्तव्यदक्ष, हे गुण शिकायला मिळाले.’

२ आ. श्री. सुरेश बोबडे आणि सौ. वैशाली बोबडे

२ आ १. निधनानंतरही घरातील वातावरण प्रसन्न असणे : श्री. विनोद कोंगरे यांच्या आईचे निधन झाल्यावर आम्ही दोघेही त्यांच्या घरी गेलो होतो. तेव्हा घरात ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप चालू असल्यामुळे शांतता होती. श्री. कोंगरेकाकांच्या तोंडवळ्यावर कुठलाच ताण जाणवत नव्हता. त्यांना पाहून प्रसन्न वाटत होते आणि घरातील वातावरण प्रसन्न होते. ३.५.२०२१ या दिवशी प्रत्यक्ष अंत्येष्टीच्या वेळीही आम्हाला कुठला त्रास झाला नाही.’

२ इ. सौ. मंगला दर्वे

२ इ १. उतारवयातही स्मरणशक्ती चांगली असणे : मी सत्संगाच्या निमित्ताने त्यांच्या घरी गेले असता माझी काकूंची भेट झाली. त्या वेळी त्यांनी प्रेमाने माझी विचारपूस केली. तेव्हा काकूंच्या लक्षात आले की, ‘मी त्यांची नातेवाईक आहे.’ काकू पटकन माझ्या वडिलांचे नाव घेऊन म्हणाल्या, ‘‘तू त्यांची मुलगी होय.’’

२ इ २. प्रेमभाव : त्यांच्याकडे गेल्यावर त्या मला म्हणायच्या, ‘‘तू आताच आली आहेस. आधी पाणी घे. चहा घे आणि नंतर सेवा कर.’’

२ ई. सौ. सुषमा चंदनखेडे आणि सौ. सत्याली देव

२ ई १. सतत देवाच्या स्मरणात असणे : ‘आजी सतत देवाच्या अनुसंधानात आहेत’, असे जाणवायचे. त्यांचे रहाणीमान चांगले होते आणि त्या नेहमी नीटनेटक्या रहायच्या. त्यांच्यामधे प्रेमभाव अधिक होता. गेलो की, त्या कुटुंबियांची आस्थेने चौकशी करायच्या.’

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक