म्युकरमायकोसिसची तीव्रता वाढलेल्या ३० टक्के रुग्णांवर उपचार अशक्य !
मुंबई – म्युकरमायकोसिस या बुरशीच्या संसर्गाचा वेग अधिक असल्याने आणि वेळेवर निदान न झाल्याने अनुमाने ३० टक्के रुग्णांवर कोणतेही उपचार होऊ शकत नाहीत, असेे केईएम् रुग्णालयातील आधुनिक वैद्यांच्या निदर्शनास आले आहे. म्युकरमायकोसिसवरील इंजेक्शनच्या मात्राही पूर्ण आणि वेळेत मिळत नसल्याने ही बुरशी नियंत्रणात आणणे अवघड होते. त्यामुळे तीव्रता वाढलेल्या रुग्णांमध्ये काहीच करता येत नाही, असे केईएम् रुग्णालयाचे औषधशास्त्राचे प्रमुख आधुनिक वैद्य मिलिंद नाडकर यांनी सांगितले.
‘केईएम्मध्ये आलेले बहुतेक रुग्ण हे अन्य रुग्णालयांमधून पाठवलेले आहेत. या प्रक्रियेत अनेकांच्या संदर्भात हा रोग मेंदूपर्यंत पोचलेला असतो. त्यामुळे शस्त्रकर्म करून किंवा अन्य उपचार करूनही काही लाभ नाही, असे ३० टक्के रुग्ण भरती आहेत’, असे केईएम् चे अधिष्ठाता आधुनिक वैद्य हेमंत देशमुख यांनी सांगितले.