महत्त्वाच्या औषधी वनस्पतींची घरगुती स्तरावर लागवड कशी करावी ?
औषधी वनस्पतींची संख्या अगणित आहे. अशा वेळी कोणत्या वनस्पती लावाव्यात ? असा प्रश्न पडू शकतो. प्रस्तुत लेखात काही महत्त्वाच्या औषधी वनस्पतींची घरगुती स्तरावर लागवड कशी करावी ? याविषयी माहिती दिली आहे. वाचक या लेखात दिलेल्या वनस्पतींव्यतिरिक्त अन्यही वनस्पती लावू शकतात. आतापर्यंतच्या लेखात आपण तुळस, अडुळसा, गुळवेल, कोरफड, कालमेघ आणि जाई यांच्याविषयीची माहिती वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/485982.html |
मार्गदर्शक : डॉ. दिगंबर मोकाट, साहाय्यक प्राध्यापक, वनस्पतीशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे तथा
प्रमुख निर्देशक, क्षेत्रीय सहसुविधा केंद्र, पश्चिम विभाग, राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ, आयुष मंत्रालय, भारत सरकार.
संकलक : श्री. माधव रामचंद्र पराडकर आणि वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
७. निर्गुंडी
७ अ. महत्त्व : हे वातावरचे रामबाण औषध आहे. निर्गुंडीची पाने शेकण्यासाठी वापरतात. ४ जणांच्या कुटुंबासाठी १ – २ झाडे असावीत.
७ आ. ओळख : हिची पाने बेलाच्या पानांप्रमाणे त्रिदल; पण लांब असतात. पानांना विशिष्ट गंध असतो. हिची पाने गुरे खात नाहीत. त्यामुळे गावांत बहुतेक शेतांच्या कुंपणाला ही लावलेली असते. रस्त्याच्या कडेला क्वचित् हे झाड सापडते. हिला निळसर रंगाचे तुरे येतात. (छायाचित्र क्र. १)
७ इ. लागवड : फांद्या लावून अभिवृद्धी करता येते. हे झाड कुंपणाला लावावे.
८. शेवगा
८ अ. महत्त्व : शेवग्याचे झाड सर्वांना परिचित आहे. शेवग्याची पाने, फुले, शेंगा यांचा आमटी आणि भाजी यांमध्ये उपयोग होतो. तब्येतीला शेवग्याची भाजी चांगली असते. आपत्काळात अन्नाची सोय म्हणून जास्तीतजास्त प्रमाणात शेवग्याची झाडे आपल्या अवतीभोवती असलेली चांगली. शेवग्याच्या सालीचाही औषधांमध्ये उपयोग होतो. शेवग्यामध्ये कॅल्शियम इत्यादी खनिजे भरपूर प्रमाणात असतात. (छायाचित्र क्र. २)
८ आ. लागवड : याची लागवड बियांपासून रोपे बनवून करतात. शेवग्याच्या बिया रुजत घालण्यापूर्वी पाणी कोमट करून त्यात रात्रभर भिजत ठेवाव्यात आणि सकाळी रुजत घालाव्यात. असे केल्याने रुजवा चांगला मिळतो. पावसाळ्याच्या आरंभी याचे खुंटही (दांडुक्याच्या जाडीच्या फांद्याही) लावले असता त्यांना मुळे फुटून झाड तयार होते. ऐन पावसात खुंटांपासून लागवड केली, तर खुंट कुजतात. त्यामुळे खुंट लावायचे झाल्यास त्यांची लागवड पावसाळ्याच्या आरंभी किंवा पाऊस गेल्यावर करावी. लावलेल्या खुंटांना १५ दिवसांत मुळे फुटतात.
९. गवती चहा
९ अ. महत्त्व : पावसाळ्यात, तसेच थंडीच्या दिवसांत नेहमी चहाच्या ऐवजी (दूध न घालता) गवती चहा घेणे आरोग्याला चांगले असते. याने लघवी साफ होते. ताप असल्यास तो उतरतो. ४ जणांच्या कुटुंबासाठी २ ते ४ गवती चहाची रोपे लावावीत.
९ आ. लागवड : गवती चहाचे बेट होते. (बेट म्हणजे गवताचा झुपका.) गवती चहा अनेक जणांकडे असतो. त्यांच्याकडून तो मागून आणून लावता येतो. पावसाळ्याच्या आरंभी गवती चहाचे बेट खणून काढावे आणि त्याचे ठोंब (मुळाकडून येणारी नवीन रोपे) वेगवेगळे करून लावावेत. ठोंब लावतांना मुळापासून वीतभर लांबीवर पाने कापावीत. गवती चहाचे बेट पावसापूर्वी खणून वेगवेगळे करून लावले नाही, तर ते कुजण्याची शक्यता असते. (छायाचित्र क्र. ३)
१०. दूर्वा
१० अ. महत्त्व : ही वनस्पती अतिशय थंड असून उष्णतेच्या विकारांवर फार मोठे औषध आहे. दूर्वा गर्भपात होण्यापासून रोखते. वाईट स्वप्ने पडत असतील, तर दूर्वांचा उपयोग होतो. घराभोवती जास्तीतजास्त दूर्वा असाव्यात. (छायाचित्र क्र. ४)
१० आ. लागवड : पावसाळ्यात दूर्वा निसर्गतःच उगवतात. या दूर्वा काढून आपल्या जागेत पाणी पडेल, अशा ठिकाणी लावाव्यात. दूर्वांची २ ते ४ रोपे आणून लावली, तरी त्या पुष्कळ प्रमाणात पसरतात. पावसाळ्यानंतर दूर्वांना पाणी न मिळाल्यास त्या कोमेजून जातात.
११. आघाडा
११ अ. महत्त्व : आघाडा उंदीर, विंचू, कुत्रा यांच्या विषावर, तसेच दातदुखीवर नामी औषध आहे. बी दुधात शिजवून त्याची खीर करून खाल्ली असता भूक लागत नाही, असे म्हणतात. वजन कमी करणे किंवा अन्नाविना रहाता यावे, यासाठी याचा उपयोग होऊ शकतो. ‘आघाड्याची मुळी प्रसूत होत असलेल्या स्त्रीच्या कटीला (कंबरेला) आणि केसांना बांधल्यास सुखप्रसूती होते. प्रसूतीनंतर बांधलेल्या मुळ्या लगेच सोडवून हळद-कुंकू घालून विसर्जित कराव्यात, नाहीतर अपायही होऊ शकतो. गर्भात मृत झालेले मूलही या उपायाने प्रसूत होते’, असे जुने लोक सांगतात.
११ आ. ओळख : पहिला पाऊस झाल्यावर याची रोपे निसर्गतः उगवतात. पावसाळा संपत येतो तेव्हा आघाड्याला तुरे येतात. (छायाचित्र क्र. ५) हे तुरे कपड्यांना चिकटतात. यांत तांदुळाप्रमाणे बी असते.
११ इ. लागवड : वस्तुतः हे तण आहे. याची लागवड करण्याची आवश्यकता नसते; परंतु आयत्या वेळी शोधून मिळण्यास कठीण होते; म्हणून याची न्यूनतम २ ते ४ रोपे आपल्या घराभोवती असावीत.
आपत्काळाच्या दृष्टीने महत्त्वाच्या औषधी वनस्पतींची घरगुती स्तरावर लागवड कशी करावी ? हे सांगणारी ही लेखमाला साधक आणि वाचक यांनी संग्रही ठेवावी. |