पन्हाळगड ते विशाळगड पावनखिंड मोहीम स्थगित करून रक्तदान शिबिरांचे आयोजन ! – कोल्हापूर डिस्ट्रिक्ट माऊंटेनिअरींग असोसिएशन
कोल्हापूर, १३ जून (वार्ता.) – पन्हाळगड ते विशाळगड पावनखिंड मोहीम ही केवळ मराठी माणसाच्याच नव्हे, तर प्रत्येक भारतीयाच्या अस्मितेचा आणि अभिमानाचा विषय आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या मोहिमांविषयी सर्वसमावेशक भूमिका ठरवण्यासाठी श्री शिवाजी मंदिर येथे सर्व दुर्गभ्रमंती करणार्या संघटनांची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत यंदाच्या वर्षीही पन्हाळगड ते विशाळगड पावनखिंड मोहीम स्थगित करून जिल्हा, तालुका आणि राज्य पातळीवर रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याचा निर्णय या सर्व संघटनांची शिखर संस्था ‘कोल्हापूर डिस्ट्रिक्ट माऊंटेनिअरींग असोसिएशन’ यांच्या वतीने घेण्यात आला.
पावनखिंड संग्रामाची अनुभूती आणि प्रेरणा जगभर पोचवण्यासाठी १२ आणि १३ जुलै या दिवशी पावनखिंड संग्रामावर आधारीत ‘फेसबूक लाईव्ह’ हा दृकश्राव्य कार्यक्रम सर्व संस्थांच्या वतीने आयोजित करेल. पुढील वर्षीपासून पावनखिंड मोहिमांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी ‘पावनखिंड संग्राम मध्यवर्ती समन्वय समिती’ एक आचारसंहिता आणि आदर्श नियमावली सिद्ध करेल. पावनखिंड मोहिमा आयोजित करणार्या सर्व संस्थांचे प्रतिनिधीत्व असणारी ही मध्यवर्ती समिती असेल, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीचे आयोजन डॉ. अमर अडके, राजेश पाटील, पंडितअण्णा पवार, हेमंत साळोखे, सागर पाटील आणि विनोद साळोखे यांनी केले. या बैठकीसाठी रामदास पाटील, सागर कडव, दीपक सावेकर, सदाशिव पाटील, उमेश कोडोलीकर, विजय ससे, विश्वनाथ भोसले यांसह विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.