नव्या ‘रोस्टर’च्या विरोधात अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपिठातील अधिवक्त्यांचा आज न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार !

अवध बार असोसिएशन ची बैठक

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपिठातील अधिवक्त्यांनी १४ जून या दिवशी न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार घालण्याची घोषणा केली आहे. येथील अवध बार असोसिएशनने ही घोषणा केली आहे. नवे ‘रोस्टर’ (सरन्यायाधिशांकडून होणार्‍या न्यायाधिशांच्या नेमणुकीची प्रक्रिया) लागू करण्याच्या संदर्भात ‘एल्डर्स समिती’ने घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ‘एल्डर्स समिती’कडून काढण्यात आलेल्या नोटिसीमध्ये म्हटले आहे की, ‘रोस्टर’च्या विरोधात असलेल्या असंतोषामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे. असोसिएशनचे म्हणणे आहे की, सरन्यायाधिशांनी ‘रोस्टर’ परत घेण्यासाठी समितीच्या आवाहनाकडे दुर्लक्ष केले. यामुळे अधिवक्ते संतप्त आहेत.