नक्षलवाद्यांकडून मराठा आंदोलकांना त्यांच्या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन !
|
गडचिरोली – ‘मराठा तरुणांनो, दलालांपासून सावध रहा’, या आशयाची पत्रके नक्षलवाद्यांकडून येथे वाटली जात आहेत. ‘आमच्यामध्ये सामील व्हा’, असे आवाहनही पत्रकाच्या माध्यमातून नक्षलवाद्यांनी मराठा तरुणांना केले आहे. ‘हे सरकार केवळ उद्योगपती अंबानी-अदानीचे आहे. त्यामुळे आरक्षण सोडून व्यवस्था पालटण्यासाठी सिद्ध रहा’, असे नक्षलवाद्यांनी म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीची आठवण करून देत मराठा तरुणांना भावनिकदृष्ट्या आकर्षित करण्याचा प्रयत्न नक्षलवाद्यांनी केला आहे. मराठा आरक्षणाच्या सूत्राआडून नक्षलवादी नवा डाव रचत आहेत. नक्षली या आंदोलनाचा अपलाभ घेण्याच्या प्रयत्नात आहेत.
नक्षलवाद्यांच्या पत्रकातील प्रक्षोभक आणि व्यवस्थेला आव्हान देणार्या या लिखाणात म्हटले आहे की,
१. मराठा समाजातून जे मूठभर दलाल भांडवलदार निर्माण झाले आहेत, तेच खर्या अर्थाने मराठा समाजाच्या अधोगतीला उत्तरदायी आहेत. या अधोगतीचे स्वरूप सामाजिक नसून आर्थिक आहे.
२. या आर्थिक अधोगतीला सरकारांची आजवरची धोरणेही कारणीभूत आहेत. त्यामुळे मराठा समाजाने आपले खरे शत्रू ओळखले पाहिजेत.
३. शिवबांच्या स्वराज्य निर्मितीमध्ये मराठा समाजाने पुढाकार घेतला होता. आता पुन्हा पुढाकार घ्यायची वेळ आली आहे.
४. त्यामुळे पुन्हा एकदा मावळे बनावे लागेल. परत एकदा गनिमी काव्याचे डावपेच वापरावे लागतील. व्यवस्थेचे रखवाल(दार), साम्राज्यवादाचे दलाल, सत्ताधारी वर्ग हे (आपले) शत्रू आहेत.
५. सर्वच समाजातील गरीब जनता आपला मित्र आहे. मैदानात माओवादी शस्त्र उचलून लढत आहेत. लक्ष्य, मार्ग, साधने सिद्ध आहेत.
६. मराठा समाजातील शिवाजी महाराजांचा खरा आदर्श बाळगणार्या मावळ्यांना आवाहन आहे की, त्यांनी रयतेचे खरे राज्य आणण्यासाठी मैदानात उतरावे.
७. आपल्या संघटित शक्तीला क्रांतीकडे वळवा. आम्ही तुमच्यासमवेत आहोत, तुमची वाट पहात आहोत.