कोरोना विभागात काम केल्याने अपकीर्ती होत असल्याविषयी परिचारिकांची पुन्हा ‘ट्रेनड् नर्सेस असोसिएशन’कडे तक्रार
परिचारिकांच्या कार्याचा गौरव करणे महत्त्वाचे असले, तरी सामाजिक आरोग्य चांगले राखण्याच्या दृष्टीने कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या परिचारिकांनीही गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, वैद्यकीयदृष्ट्या योग्य होईल !
मडगाव, ११ जून (वार्ता.)- ‘कोरोना वॉर्ड’मध्ये काम केलेल्या परिचारिकांना सार्वजनिक कार्यक्रमात बोलावू नये. त्यामुळे सहभागी लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो’, अशा आशयाचा संदेश डिचोली येथील शिक्षणतज्ञ व्हिक्टोरिया डायनोसिओ यांनी सामाजिक माध्यमांवरून प्रसारित केला आहे. अशा संदेशांद्वारे परिचारिकांच्या कामाचा अपमान होत आहे. याविषयी दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयातील कॅज्युअल्टी विभागाच्या प्रमुख लिस्मा बार्रेटो यांनी ट्रेेनड् नर्सेस असोसिएशनकडे पुन्हा तक्रार केली आहे. ‘संबंधित व्यक्तीने याविषयी परिचारिकांची क्षमा मागावी. अशा व्यक्तीवर कारवाई करण्यात यावी’, अशी मागणी लिस्मा यांनी केली आहे.
कोरोना महामारीच्या काळात पहिल्या फळीत कार्यरत असलेल्या परिचारिका मार्च २०२० पासून अविरत काम करत आहेत. मडगाव येथील एका गृहनिर्माण संकुलात वास्तव्यास असणार्या परिचारिकांच्या सूत्रावरून संकुलाने पाठवलेल्या नोटिसीनंतर नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया आल्या होत्या. त्यानंतर गृहनिर्माण संकुलाच्या अध्यक्षांनी क्षमा मागितल्यानंतर हे प्रकरण मिटले होते.
पोलीस तक्रार करणार ! – अखिल गोवा परिचारिका असोसिएशन
परिचारिकांच्या अपकीर्तीविषयीची तक्रार आमच्याकडे आली आहे. याची गंभीर नोंद असोसिएशनने घेतली आहे. कोरोना काळात रुग्णांचे प्राण वाचवणार्या परिचारिकांचा सन्मान केला पाहिजे; मात्र काही जणांकडून चुकीचे प्रकार घडत आहेत. डिचोली पोलीस ठाण्यात संबंधित महिलेच्या विरोधात तक्रार नोंदवली जाईल. कुंतल केरकर, अध्यक्ष, अखिल गोवा परिचारिका असोसिएशन