सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोना महामारीशी संबंधित सूत्रे !
कोरोनाबाधितांच्या मृतदेहाची हेळसांड होऊ नये, यासाठी अंत्यसंस्कार करण्याची ‘फरा प्रतिष्ठान’ची सिद्धता
दोडामार्ग – तालुक्यातील एका गावातील युवकावर कोरोनाबाधित वडिलांच्या मृतदेहावर एकट्याने अंत्यसंस्कार करण्याची वेळ आल्याची घटना घडली. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील केर येथील ‘फरा प्रतिष्ठान’चे अध्यक्ष तथा सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रेमानंद देसाई यांनी आवाहन केले आहे की, ‘मृत कोरोनाबाधित व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यास कुणीही पुढे येत नसतील आणि मृतदेहाची हेळसांड होत असेल, तर अशा प्रसंगी संबंधित कुटुंबाच्या मागे ‘फरा प्रतिष्ठान’ खंबीरपणे उभे राहील. अंत्यसंस्कारासाठी सर्वतोपरी साहाय्य केली जाईल. या कार्यात सामाजिक बांधिलकीच्या नात्याने सहभागी होऊ इच्छिणारे आणि असा प्रसंग ज्यांच्यावर येईल, त्यांनी ९४२२३७९५५१ किंवा ९१३०७७९५५१ या क्रमांकावर संपर्क करावा.’
जिल्ह्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे जिल्हा रुग्णालयासमोर आंदोलन
सिंधुदुर्ग – जिल्हा रेड झोनमध्ये गेल्याने आणि प्रतिदिन वाढणारे मृत्यू याला पालकमंत्री आणि राज्य सरकार उत्तरदायी आहेत, असा आरोप करत भाजपच्या वतीने ११ जूनला जिल्हा रुग्णालयासमोर आंदोलन करण्यात आले.
भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या वेळी पालकमंत्री उदय सामंत यांच्या कार्यपद्धतीचा निषेध करण्यात आला. जिल्हावासियांना योग्य सुविधा न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याची चेतावणी या वेळी देण्यात आली. या वेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना कह्यात घेऊन कारवाई केली.
अत्यावश्यक सेवेतील दुकाने आता शनिवार आणि रविवार या दिवशीही चालू रहाणार
कणकवली – जिल्हाधिकार्यांच्या आदेशाप्रमाणे शासनाने दिलेल्या निर्देशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्याचा चौथ्या टप्प्यामध्ये समावेश असल्याने दवाखाने आणि मेडिकल दुकाने वगळून अन्य सर्व दुकाने शनिवार आणि रविवार हे २ दिवस बंद रहातील, असे यापूर्वी घोषित करण्यात आले होते; मात्र आता सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या प्राप्त झालेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार शनिवार आणि रविवार हे २ दिवस चिकित्सालये आणि मेडिकलची दुकाने यांव्यतिरिक्त अन्य अत्यावश्यक सेवेतील दुकाने दुपारी ४ वाजेपर्यंत उर्वरित दिवसांप्रमाणेच चालू ठेवता येणार आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवेत नमूद करून दिलेले व्यापारी, दुकानदार यांना कोरोनाविषयीच्या नियमांचे पालन करून दुकाने चालू ठेवता येणार आहेत.
उसप येथे कोरोनाबाधित महिलेवर अंत्यसंस्कार करण्यासाठी लोकप्रतिनिधींचा पुढाकार
दोडामार्ग तालुक्यातील उसप येथे एका ७० वर्षे वयाच्या महिलेचे कोरोनामुळे निधन झाले. त्यानंतर त्या महिलेवर अंत्यसंस्कार करण्याचा प्रश्न निर्माण झाला. त्या वेळी सरपंच दिनेश नाईक, पंचायत समिती सदस्य बाळा नाईक, राजाराम गवस, शंकर जाधव, शंकर नाईक, नीलेश नाईक, प्रकाश पांडुरंग गवस, संतोष केरकर, दीपक शेटकर, गोट्या कळणेकर, संतोष नाईक, संतोष जाधव, सूर्या केरकर, बाबणी केरकर आदींनी त्या महिलेवर नातेवाईकांच्या साहाय्याने अंत्यसंस्कार केले. कोरोनाच्या काळात रक्ताच्या नात्याची माणसे अंत्यसंस्कार करण्यासाठी जवळ येत नाहीत, अशी स्थिती असतांना उसपचे सरपंच, त्यांचे शिपाई, नळ कामगार आणि पंचायत समिती सदस्य, गावातील युवक आदींनी पुढाकार घेऊन विधीवत् अंत्यसंस्कार केले, ही नक्कीच आदर्शवत् घटना म्हणावी लागेल.
कणकवली शहरातील व्यापार्यांची ‘रॅपिड टेस्ट’ केली जाणार
कणकवली – शहरातील व्यापार्यांची ‘रॅपिड’ कोरोना चाचणी करण्यात येणार असून त्याची कार्यवाही १४ जूनपासून करण्यात येणार आहे. ज्या व्यापार्यांना शक्य आहे त्यांनी स्वतःहून ही चाचणी करून तिचा अहवाल स्वत:जवळ ठेवला, तरी चालणार आहे. या चाचणीसाठी शहरातील पटकीदेवी ते पटवर्धन चौकपर्यंतच्या अंतरात ३ ठिकाणी लाळेचा नमुना (स्वॅब) घेण्याचे केंद्र कार्यरत असेल. शासनाच्या आदेशाप्रमाणे व्यापार्यांना ‘रॅपिड टेस्ट’ करणे बंधनकारक आहे. शहरातील व्यापार्यांनी या तपासणी मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे आणि मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे नवीन ४१४ रुग्ण
१. एकूण कोरोनाबाधित रुग्ण ३३ सहस्र ४४
२. उपचार चालू असलेले रुग्ण ६ सहस्र ६४५
३. २४ घंट्यात मृत्यू झालेले रुग्ण ४
४. मृत्यू झालेले एकूण रुग्ण ८३३
५. बरे झालेले एकूण रुग्ण २५ सहस्र ५६०