नागपूर येथील शासकीय रुग्णालयात तोतया आधुनिक वैद्याला पकडले !
दोन मासांपासून नर्सिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला एक जण बनावट वैद्य बनून रुग्णालयात उघडपणे वावरत असतांना आधुनिक वैद्य आणि अन्य कर्मचारी यांच्यापैकी कुणाच्याच कसे लक्षात येत नाही ? यातून रुग्णालयाच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर येतो !
नागपूर – येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील (मेडिकल) प्रभागात १० जून या दिवशी सकाळी रुग्ण पडताळतांना सिद्धार्थ जैन (वय २३ वर्षे) या तोतया आधुनिक वैद्याला मुख्य वैद्यकीय अधिकार्याने महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या सैनिकांच्या साहाय्याने पकडले. या तोतया आधुनिक वैद्याने रुग्णालयातील काही कोरोना संशयितांच्या स्वॅबचे नमुनेही घेतले. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा नोंद केला आहे.
सिद्धार्थ याने पोलिसांना कमला नेहरू महाविद्यालयातून ‘बीएस्सी नर्सिर्ंग’चा अभ्यासक्रम उत्तीर्ण केल्याचे सांगितले. तो रुग्णसेवेच्या अनुभवासाठी गेल्या दीड ते दोन मासांपासून रुग्णालयातील विविध प्रभागांत रुग्ण पडताळत होता. त्याने शल्यकर्म गृहातील आधुनिक वैद्यांप्रमाणे कपडे घातले होते. येथे रुग्णांची पडताळणी करत असतांना मुख्य वैद्यकीय अधिकार्यांना त्याचा संशय आला. त्यांनी लगेच ही माहिती वैद्यकीय अधीक्षक कार्यालयाला दिली. रुग्णालयातील विविध प्रभागांत फिरतांना त्याला निवासी आधुनिक वैद्यांनी विचारल्यास तो स्वत:ला ‘मुख्य निवासी आधुनिक वैद्य’ असल्याचे सांगायचा, तर मुख्य निवासी आधुनिक वैद्यांनी विचारल्यास तो त्यांना औषधशास्त्र विषयाचा निवासी आधुनिक वैद्य असल्याचे सांगत होता.