खटला लढण्यासाठी विशेष सरकारी अधिवक्ता उज्ज्वल निकम यांना मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची प्रतीक्षा !

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण

अधिवक्ता उज्ज्वल निकम

नागपूर – विशेष सरकारी अधिवक्ता उज्ज्वल निकम यांनी हरिसाल वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा खटला लढण्याची सिद्धता दर्शवली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या लेखी आदेशाची त्यांना प्रतीक्षा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सौ. सुप्रिया सुळे यांनी अधिवक्ता निकम आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी चर्चा केली. येत्या २ दिवसांत यावर निर्णय होणे अपेक्षित आहे, असा निरोप त्यांनी ‘जस्टीस फॉर दीपाली’ समूहाच्या प्रमुख अरुणा सबाने यांना दिला आहे.

१. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे निलंबित क्षेत्रसंचालक श्रीनिवास रेड्डी यांच्या जामीन अर्जावरील सुनावणीच्या वेळी सरकार बाजू मांडण्यात अल्प पडले. त्यामुळे अटीच्या आधारे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने त्यांना जामीन संमत केला आहे.

२. तेव्हापासूनच ‘या प्रकरणात विशेष सरकारी अधिवक्त्यांची नियुक्ती करावी’, अशी मागणी होत होती.

३. दिवंगत दीपाली चव्हाण यांची आई शकुंतला चव्हाण, तसेच पती राजेश मोहिते यांनी २५ मे या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहराज्यमंत्री यांना त्याविषयी पत्र पाठवून हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्याची मागणी केली होती; पण सरकारने त्यावर काहीच केले नाही. शेवटी अरुणा सबाने यांनी सौ. सुप्रिया सुळे यांच्याशी संपर्क साधला. अधिवक्ता उज्ज्वल निकम यांच्याशी चर्चा केली. ‘सरकारने आदेश दिल्यास हा खटला लढण्यास आमची काहीही हरकत नाही’, असे अधिवक्ता निकम यांनी सांगितले.

४. दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याने उच्च न्यायालयातून जामीन अर्ज मागे घेतला आहे. अन्वेषण अधिकार्‍यांनी सत्र न्यायालयात दोषारोपपत्र प्रविष्ट केले असून परिस्थिती पालटल्यामुळे आता त्यांना जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज करावा लागेल.