पलूस (जिल्हा सांगली) येथील ‘डेडिकेटेड कोविड (सशुल्क) कक्ष’ येथे कोरोनावर उपचार घेतांना आलेले चांगले अनुभव

८ ऑक्टोबर २०२० या दिवशीपासून मला सर्दी, ताप आणि अंगदुखी यांचा त्रास चालू झाला. त्या वेळी मी औषधोपचार चालू केले. हा त्रास १० ऑक्टोबर या दिवशी सकाळपासून पुन्हा वाढला. त्या वेळी माझ्या यजमानांनी सनातनचे सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना संपर्क करून नामजपादी उपाय विचारून घेतले. त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी माझा मुलगा रणजित याने ऑक्सिमीटरने माझी ऑक्सिजन पातळी तपासली. त्याला ती न्यून जाणवल्यानंतर त्याने त्याच्या आधुनिक वैद्य मित्राला संपर्क केला आणि त्या आधुनिक वैद्यांनी मला ६ मिनिटे चालण्यास सांगून पुन्हा ऑक्सिजनची पातळी तपासण्यास सांगितले. त्याप्रमाणे केल्यानंतर ऑक्सिजन पातळी पुन्हा न्यून जाणवली. यानंतर माझ्या मुलाने आधुनिक वैद्या (कु.) शिल्पा बर्गे यांना भ्रमणभाष करून सर्व परिस्थिती सांगितली. त्यांनी ‘कोविड कक्षात’ भरती होण्यास सुचवले. त्यांनी पलूस येथील ‘डेडिकेटेड कोविड (सशुल्क) कक्षा’त संबंधित आधुनिक वैद्यांना भ्रमणभाष करून मला भरती करून घेण्यास सांगितले.

साधिकेची कोरोनाविषयक चाचणी ‘पॉझिटिव्ह’ येणे, रुग्णालयातील कक्षात एकटी असतांना ‘स्वतःसमवेत कुणीतरी आहे’, असे साधिकेला जाणवणे

मी रुग्णालयात भरती होत असतांना परात्पर गुरुदेव डॉ. आठवले यांना माझ्याकडून पुष्कळ आर्ततेने प्रार्थना होत होत्या. मी कोविड कक्षात भरती झाल्यानंतर आधुनिक वैद्यांनी माझी ‘ॲन्टिजेन’ (कोरोनाविषयक) चाचणी केली आणि ती पॉझिटिव्ह (सकारात्मक) आली. त्यानंतर मला लगेच एका स्वतंत्र खोलीत ठेवून औषधोपचार चालू केले. त्या रात्री सतत पाऊस पडत होता आणि वीजपुरवठाही खंडित झाला होता. त्या खोलीत मी एकटीच होते (त्या आधी मी कधीच एकटी राहिले नव्हते.) आणि माझी परात्पर गुरुदेवांना सतत प्रार्थना होत होती. त्या वेळी ‘स्वतःसमवेत कुणीतरी आहे’, असे जाणवत होते.

दुसर्‍या दिवशी माझी छातीची क्ष-किरण (एक्स-रे) चाचणी केली. त्यानंतर आधुनिक वैद्यांनी तासगाव येथे जाऊन ‘एच्.आर्.सी.टी.’ची (या चाचणीतून कोरोना संसर्ग किती झाला आहे, हा भाग कळतो.) चाचणी करण्यास सांगितली. त्या चाचणीत ‘एच्.आर्.सी.टी. स्कॅन’चा ‘स्कोर’ ७ आल्याचे कळले आणि मी पुन्हा कोविड रुग्णालयात भरती झाले. यानंतर सनातनच्या संत पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी भ्रमणभाष करून नामजपादी  उपाय करून अनुभूती घेण्यास सांगितले.

आधुनिक वैद्य आणि परिचारिका यांनी काळजी घेणे अन् विचारपूस करणे

कोविड कक्षात आधुनिक वैद्य सातत्याने माझी तपासणी करण्यास येत होते. ते आधुनिक वैद्य मला ‘घाबरू नका. काही हवे असल्यास सांगा’, असे सांगत होते. तसेच त्यांनी असेही सांगितले की, आम्हाला तुमच्याकडे लक्ष देण्यास आणि काळजी घेण्यास ४-५ जणांनी भ्रमणभाष करून सांगितले आहे. याचसमवेत कोविड कक्षातील परिचारिका माझा रक्तदाब तपासणे आणि औषधे देण्ो यांसाठी वेळच्या वेळी येत होत्या. त्या काळात मला जेवण जात नव्हते आणि माझ्या तोंडाला काही चव नव्हती. तेव्हा त्या परिचारिका मला प्रेमभावाने समजवण्याचा प्रयत्न करत होत्या. त्या कोविड कक्षात सकाळी न्याहारी आणि चहा, दुपारी जेवण, सायंकाळी चहा आणि रात्री जेवण वेळेवर देत होते. आम्हाला येणारे जेवण उत्कृष्ट असे. त्या कक्षात स्वच्छताही होती. त्या परिचारिकांचे बोलणे ऐकून त्या ‘आपल्या साधकच आहेत’, असेच जाणवत होते. रुग्णालयात कुणालाही तातडीने उपचार हवे असल्यास तेथील ५ ही आधुनिक वैद्य तातडीने उपस्थित राहून उपचार करत. तसेच परिचारिकाही वेळोवेळी तपासण्या करून इंजेक्शन्स् आणि औषधे देत असत.

१५ दिवसांनी पूर्णपणे बरे झाल्यानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला, त्या वेळी  गुलाबाची फुले देऊन निरोप देण्यात आला. तसेच ‘तुम्हाला येथे काही अडचणी आल्या का ? आमच्याकडून काही राहिले का ?’, अशी विचारणा केली. (‘डेडिकेटेड कोविड (सशुल्क) कक्ष’चा आदर्श अन्य रुग्णालयांनी घ्यायला हवा ! – संपादक)

साधक रुग्ण असलेल्या कोविड कक्षात परिचारिकांना चांगले वाटणे

माझे यजमान श्री. खोत यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांनाही याच रुग्णालयात, मला ठेवण्यात आलेल्या कोविड कक्षात भरती करण्यात आले. आम्ही दोघेही एकाच खोलीमध्ये होतो. त्या काळात औषधांमुळे प्रचंड ग्लानी येत होती; पण परात्पर गुरुदेवांच्या कृपेने रात्री २ वाजेपर्यंत नामजपासह अन्य उपाय होत होते. रुग्णालयातील परिचारिका जेव्हा आमच्या कक्षात यायच्या, तेव्हा ‘तुमच्या खोलीत पुष्कळ चांगले वाटते’, असे म्हणायच्या.

आधुनिक वैद्य सनातनचे हितचिंतक असल्याचे कळल्यावर पुष्कळ कृतज्ञता वाटणे

आम्ही घरी आल्यानंतर ८ दिवसांनी सर्वसाधारण तपासणी करण्यासाठी पुन्हा कोविड कक्षातील आधुनिक वैद्यांकडे त्यांच्या स्वत:च्या रुग्णालयात गेलो, तेव्हा त्या आधुनिक वैद्यांशी आमची साधनाविषयक चर्चा झाली. त्या वेळी त्या आधुनिक वैद्यांनी ‘मी सनातनचा रामनाथी येथील आश्रम पाहून आलो आहे’, हे सांगितल्यानंतर पुष्कळ कृतज्ञता वाटली.

एकूणच या काळात परात्पर गुरुदेव माझी आधुनिक वैद्य, परिचारिका आणि अन्य व्यक्ती यांच्या माध्यमातून किती काळजी घेत आहेत, असे प्रकर्षाने जाणवले आणि कृतज्ञता वाटली. – सौ. अलका भीमराव खोत, पलूस, जिल्हा सांगली.

कोरोनाच्या काळात आलेले चांगले अनुभव त्वरित कळवा !

आरोग्य साहाय्य समिती

पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, आरोग्य साहाय्य समिती, ‘मधु स्मृती’, सत्यनारायण मंदिराच्या शेजारी, फोंडा, गोवा. ४०३ ४०१.

संपर्क क्रमांक : ७०५८८८५६१०

ई-मेल पत्ता : arogya.sahayya@hindujagruti.org