कोरोनाबाधित रुग्णांच्या प्रमाणावरून राज्यातील जिल्हानिहाय निर्बंध घोषित !
मुंबई – कोरोनाबाधित रुग्णांच्या प्रमाणावरून राज्य सरकारने १४ ते २१ जून या कालावधीसाठी ५ टप्प्यांनुसार जिल्हानिहाय निर्बंध घोषित केले आहेत. यापुढे आता प्रत्येक आठवड्याला अशा प्रकारचे प्रमाण सरकारकडून घोषित करण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यातील जिल्हेनगर, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नांदेड, नंदुरबार, परभणी, रत्नागिरी, सोलापूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ दुसर्या टप्प्यातील जिल्हेयामध्ये राज्यातील एकाही जिल्ह्याचा समावेश नाही. तिसर्या टप्प्यातील जिल्हेअकोला, संभाजीनगर, बीड, गडचिरोली, मुंबई, नागपूर, धाराशिव, पालघर, सांगली, ठाणे चौथ्या टप्प्यातील जिल्हेकोल्हापूर, नाशिक, पुणे, रायगड, सातारा, सिंधुदुर्ग पाचव्या टप्प्यातील जिल्हेयामध्ये राज्यातील एकाही जिल्ह्याचा समावेश नाही. |
पहिला टप्पा
१. सर्व प्रकारची दुकाने, मॉल, मल्टीप्लेक्स, नाट्यगृहे, व्यायामशाळा, केशकर्तनालये, ब्युटीपार्लर, स्पा, वेलनेस सेंटर, तसेच विविध खेळ, चित्रीकरण, सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रम यांना अनुमती असेल.
२. लोकल रेल्वेगाड्या चालू होतील; मात्र स्थानिक प्रशासनाला निर्णय घेण्याचा अधिकार असेल.
३. सार्वजनिक ठिकाणे, मैदाने, सार्वजनिक वाहतूक सेवा, खासगी आणि शासकीय कार्यालये पूर्ववत चालू होतील.
४. लग्नसोहळा, अंत्यविधी, बैठका, निवडणूक यांवर कोणतीही बंधने नसतील. जमावबंदीही नसेल.
दुसरा टप्पा
१. रेस्टॉरंट, मॉल, चित्रपटगृहे, व्यायामशाळा, केशकर्तनालये, स्पा, वेलनेस सेंटर ५० टक्के क्षमतेने, तर सार्वजनिक जागा, मैदाने, वॉकिंग ट्रॅक, बांधकाम, कृषी क्षेत्र, ई सेवा चालू राहील.
२. बस, खासगी वाहने, अन्य राज्यांत जाणारी लोकल सेवा, टॅक्सी यांना अनुमती असेल.
तिसरा टप्पा
१. अत्यावश्यक सेवेतील दुकाने नियमित सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत चालू असतील, तर अन्य दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत चालू रहातील. मॉल आणि चित्रपटगृह पूर्णपणे बंद रहातील.
२. उपाहारगृहे ५० टक्के क्षमतेने सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत चालू रहातील; मात्र दुपारी २ नंतर पार्सल सेवा चालू राहील. उपाहारगृहे शनिवारी आणि रविवारी बंद रहातील.
३. सार्वजनिक उद्याने, मैदाने, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक पहाटे ५ ते सकाळी ९ या वेळेत चालू रहातील. खासगी आणि शासकीय कार्यालये ५० टक्के क्षमतेने चालू रहातील.
४. चित्रपटांच्या चित्रीकरणाला चित्रीकरण कक्षात अनुमती असेल. सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमांना सोमवार ते शुक्रवार ५० टक्के क्षमतेने दुपारी २ पर्यंत अनुमती राहील.
५. लग्नसोहळ्यासाठी ५० जणांची, अंत्यविधीसाठी २० जणांची उपस्थिती, तर अन्य बैठकांसाठी ५० टक्के उपस्थिती असेल.
६. कृषी आणि बांधकाम क्षेत्र, तसेच ई कॉमर्स कामांना दुपारी २ वाजेपर्यंत अनुमती असेल. दुपारी २ नंतर जमावबंदी राहील.
चौथा टप्पा
१. अत्यावश्यक सेवेतील दुकाने सोमवार ते शुक्रवार या कालावधीत सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत चालू रहातील. अन्य दुकाने मात्र पूर्णपणे बंद रहातील.
२. चित्रपटगृहे, मॉल पूर्णपणे बंद रहातील. उपाहारगृहांमध्ये केवळ पार्सल सेवा चालू राहील.
३. सार्वजनिक उद्याने, मैदाने, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक सोमवार ते शुक्रवार पहाटे ५ ते सकाळी ९ या वेळेत चालू रहातील.
४. अत्यावश्यक सेवेतील खासगी कार्यालये आणि शासकीय कार्यालये यांमध्ये केवळ २५ टक्के उपस्थिती असेल. कोणत्याही सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना अनुमती नसेल.
५. लग्नसोहळा २५, तर अंत्यविधीसाठी २० जणांची उपस्थिती असेल. राजकीय किंवा अन्य बैठकांना ५० टक्के क्षमता चालेल.
६. कामगारांची रहाण्याची सोय असल्यास बांधकामे चालू रहातील. कृषी कामे सोमवार ते शुक्रवार दुपारी २ पर्यंत चालू रहातील.
७. ई कॉमर्स सेवा केवळ अत्यावश्यक सेवेसाठी चालू रहातील. केशकर्तनालये आणि व्यायामशाळा ५० टक्के क्षमतेने चालू रहातील. येथे वातानुकूलित यंत्राचा उपयोग करता येणार नाही.
८. बससेवा ५० टक्के क्षमतेने चालू राहील. संचारबंदीचे नियम लागू रहातील.