राज्य सरकारने १०० वारकर्यांना पायी वारीला जाऊ द्यावे ! – रवींद्र पाटील, अध्यक्ष, श्रीसंत मुक्ताई संस्थान
२ दिवसांत निर्णय देण्याची मागणी
जळगाव – ‘जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथून आषाढी एकादशीच्या वारीसाठी श्रीसंत मुक्ताईंचा पालखी सोहळा १४ जून या दिवशी प्रस्थान करणार आहे. यावर्षी सुदैवाने वारी काळात कोरोनाचा संसर्ग काहीअंशी अल्प झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने आषाढीच्या वारीसाठी पालखी सोहळ्यासमवेत १०० वारकर्यांना पायी चालत जाण्याची अनुमती द्यावी. समस्त वारकरी बांधव शिस्त पाळून पालखी सोहळ्यात सहभागी होतील’, अशी विनंती श्रीसंत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष अधिवक्ता रवींद्र पाटील यांनी येथे १० जून या दिवशी केली.
ते पुढे म्हणाले की, राज्यातील प्रमुख मानाच्या पालख्यांपैकी एक असलेली मुक्ताईंची पालखी ही राज्यात सर्वप्रथम प्रस्थान करते. पुढे ही पालखी ७५० किलोमीटर अंतर पार करून पंढरपूर येथे येते. या वारीसाठी ३४ दिवस लागतात. पंढरपूरजवळ वाखारी येथे मुक्ताईंच्या पालखीसमवेत श्रीसंत तुकाराम, श्रीसंत ज्ञानेश्वर, श्रीसंत सोपानदेव यांच्या पालख्या एकत्र भेटतात. नंतर त्या एकत्रितपणे पंढरपूर येथे येतात. जागतिक कोरोना महामारीचे भान ठेवून आम्ही शिस्तीचे पालन करू. राज्य सरकारप्रमाणे आमचेही दायित्व आहे. वारकरी संप्रदायाची वारीची परंपरा कायम रहावी, यासाठी राज्य सरकारने २ दिवसांत आम्हाला सकारात्मक निर्णय द्यावा.