फलटण (जिल्हा सातारा) येथे अवैध गोमांस विक्रीप्रकरणी गत ६ मासांत १७ जणांना अटक

४१ जणांविरुद्ध गुन्हा नोंद, तर ५ हून अधिक आरोपींविरुद्ध सीमापारीचा प्रस्ताव

यावरून ‘राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा केवळ कागदावरच आहे’, असे वाटल्यास चूक ते काय ! गोवंशियांची हत्या करणार्‍यांवर कठोर आणि त्वरित कारवाई केली, तरच गुन्हेगारांवर वचक बसेल, हे पोलिसांनी लक्षात घ्यायला हवे !

सातारा, ११ जून (वार्ता.) – फलटण शहरातील कुरेशीनगर भागात गत ६ मासांत पोलिसांनी केलेल्या कारवायांत १४ वाहने आणि ३ टन वजनाहून अधिक गोमांस शासनाधीन करण्यात आले. हा एकूण १ कोटी रुपयांहून अधिक मुद्देमाल आहे. या कारवायांमध्ये आतापर्यंत १७ जणांना अटक करण्यात आली असून ४१ जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच ५ हून अधिक आरोपींविरुद्ध सीमापारीचे (तडीपारीचे) प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. (कारवाई न झालेल्या गुन्हेगारांची संख्या किती असेल ? पोलीस गोवंशियांची हत्या करणार्‍यांवर धाक केव्हा निर्माण करणार ? – संपादक)

फलटण पोलिसांनी गत ६ मासांत किमान २५० गोवंशियांचे प्राण वाचवले आहेत. कुरेशीनगर भागात अजूनही चोरट्या मार्गाने गोवंशियांची हत्या चालूच आहे. पोलिसांनी कह्यात घेतलेल्या मुद्देमालाहून अधिक उलाढाल चालू आहे. (ही पोलिसांची अकार्यक्षमता आहे कि गुन्हेगारांपुढे पत्करलेली हतबलता, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ? – संपादक)