मालाड इमारत दुर्घटनेप्रकरणी न्यायालयाला उत्तरदायी ठरवल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने महापौरांना फटकारले
मुंबई – ‘स्वत:च्या चुकांसाठी न्यायालयाला उत्तरदायी ठरवू नका’, अशा शब्दांमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईच्या महापौर सौ. किशोरी पेडणेकर यांना फटकारले आहे. मालाड येथील इमारत दुर्घटनेप्रकरणी ‘न्यायालयाचा आदेश असल्याने अनधिकृत बांधकामांच्या विरोधातील कारवाई थांबली’, असे वक्तव्य सौ. पेडणेकर यांनी केले होते. यावर न्यायालयाने ‘मोडकळीस आलेल्या इमारतींविषयी आपला आदेश नव्हता. पालिकेला भुईसपाट कराव्या लागतील, अशा इमारतींसाठी न्यायालयात येण्याची सोय आहे. स्वत:वरील दोष न्यायालयावर ढकलू नका’, असे स्पष्ट केले. मालाड येथे झालेल्या इमारतीच्या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला आहे.