पाण्याची पातळी वाढवण्यासाठी भूजल पुनर्भरण आवश्यक ! – मल्लीनाथ कलशेट्टी, संचालक, भूजल सर्वेक्षण आणि विकासयंत्रणा
कोल्हापूर – राज्यातील अतीशोषित, शोषित पाणलोट क्षेत्रे आणि तेथील पाण्याच्या पातळीत झालेली घट भरून काढण्यासाठी पाऊस, पाणी संकलन आणि भूजल पुनर्भरण ही काळाची आवश्यकता आहे, असे मत भूजल सर्वेक्षण आणि विकासयंत्रणेचे संचालक डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी व्यक्त केले. भूजल सर्वेक्षण आणि विकासयंत्रणेच्या सुवर्ण महोत्सव वर्षाच्या निमित्ताने भूजल सर्वेक्षण आणि विकासयंत्रणा अन् शिवाजी विद्यापिठाच्या भूगोल विभागाच्या विद्यमाने आयोजित ‘पाऊस पाणी संकलन आणि भूजल प्रदूषण’, या विषयावरील ‘वेबिनार’मध्ये ते बोलत होते. शिवाजी विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. डी.टी. शिर्के प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कुलगुरु डॉ. शिर्के यांनी भूजल सर्वेक्षण आणि विकासयंत्रणेच्या उपक्रमाचे कौतुक करून यासाठी शिवाजी विद्यापीठ सहकार्य करेल, असे सांगितले. ‘वॉटर फील्ड रिसर्च फाउंडेशन’चे व्यवस्थापकीय संचालक संदीप अध्यापक यांनी पाऊस पाणी संकलन आणि भूजल पुनर्भरण या विषयावर सविस्तर माहिती दिली. पर्यावरण तज्ञ उदय गायकवाड यांनी भूजल आणि भूपृष्ठावरील पाणीसाठे, प्रदूषण, नागरी वस्त्यांमुळे होणारे प्रदूषण, औद्योगिकरणामुळे होणारे भूजलाचे प्रदूषण, शेतीमध्ये वापरली जाणारी रासायनिक खते, कीटकनाशके, तणनाशके यांमुळे होणार्या प्रदूषणाची माहिती दिली. शिवाजी विद्यापिठाचे भूगोल विभागप्रमुख संभाजी शिंदे यांनी आभार मानले.