सोलापूर जिल्ह्यातील वीज वितरणची थकबाकी १८८ कोटी रुपयांवर
सोलापूर – मागील दोन मासांत कोरोनाचा वाढता संसर्ग, तसेच अनेक ग्राहकांनी वीजदेयक भरण्याकडे केलेले दुर्लक्ष यांमुळे जिल्ह्यातील विविध प्रकारच्या अनुमाने ४ लाख ३५ सहस्र २१० वीज ग्राहकांकडे जवळपास १८८ कोटी ४८ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे ग्राहकांनी वीजदेयक भरावे आणि सहकार्य करावे, असे आवाहन वीज वितरण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
मागील दोन मासांत पुणे, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये लघुदाब घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक या वर्गवारीतील ९ लाख ९० सहस्र वीजग्राहकांनी वीजदेयकांचे ३९४ कोटी २२ लाख रुपये थकवले असून सद्य:स्थितीत या वर्गवारीतील २८ लाख ५५ सहस्र ग्राहकांकडे १ सहस्र ३५९ कोटी ४ लाख रुपयांची थकबाकी आहे. महावितरणची आर्थिक घडी विस्कटली असतांना पुन्हा थकबाकी वाढत असल्यामुळे थकित आणि चालू वीजदेयक यांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी केले आहे.
अधिकृत वीजदेयक भरणा केंद्र चालू
सर्व वीजग्राहकांना घरबसल्या देयक भरण्यासाठी www.mahadiscom.in ही वेबसाईट, तसेच मोबाईल ॲपद्वारे ‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध आहे. लघुदाब वर्गवारीतील औद्योगिक, वाणिज्यिक आणि घरगुती ग्राहकांचे वीजदेयक १० सहस्र रुपयांपेक्षा अधिक असल्यास त्यांना ‘आर्.टी.जी.एस्.’ किंवा ‘एन्.ई.एफ्.टी.’द्वारे थेट वीजदेयक भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी संबंधित वीजदेयकांवर महावितरणच्या अधिकोष खात्याचा तपशीलही देण्यात येत आहे.