कुलभूषण जाधव यांना वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्याची संमती देणार्‍या विधेयकाला पाकिस्तानच्या संसदेची मान्यता

आंतरराष्ट्रीय न्यायालयासमोर पाकिस्तान झुकले; कुलभूषण जाधव यांना मोठा दिलासा

माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव

इस्लामाबाद – आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या दबावासमोर झुकत पाकिस्तानच्या ‘नॅशनल असेंब्ली’ने भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्याची संमती देणार्‍या विधेयकाला मान्यता दिली आहे. यामुळे कुलभूषण जाधव यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पाकिस्तानमधील सैनिकी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना एका कथित बॉम्बस्फोटाच्या प्रकरणी दोषी ठरवत मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली होती. कुलभूषण जाधव यांना या शिक्षेविरोधात दाद मागण्याचाही अधिकार नव्हता. या सूत्रावर आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला फटकारले होते. आता ‘नॅशनल असेंब्ली’ने मान्यता दिलेल्या विधेयकानुसार, जाधव यांना त्यांच्या अन्याय्य शिक्षेविरोधात पाकिस्तानमधील वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्याची संधी मिळणार आहे.

पाकने कुलभूषण जाधव यांना वर्ष २०१६ मध्ये केली होती अन्याय्य अटक !

पाकमधील गुप्तचर यंत्रणांनी कुलभूषण जाधव यांना ३ मार्च २०१६ या दिवशी बलुचिस्तान येथून अटक केली होती. त्या वेळी पाकने ‘कुलभूषण जाधव नौदलात ‘कमांडिंग ऑफिसर’ दर्जाचे अधिकारी असून ते भारतातील ‘रॉ’ या गुप्तचर विभागासाठी काम करत होते, तसेच ते पाकमध्ये हेरगिरीही करत होते’, असे आरोप केले होते. जाधव यांनी इराणमार्गे पाकमध्ये प्रवेश केल्याचा कांगावाही पाकने केला होता. यानंतर पाकिस्तानच्या सैनिकी न्यायालयाने एप्रिल २०१७ मध्ये हेरगिरी आणि आतंकवाद यांची कलमे लावून कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा ठोठावली. यास भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात आव्हान दिले. तेव्हा आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला फटकारत जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिली होती. या प्रकरणी अंतिम निकाल लागेपर्यंत फाशीच्या शिक्षेची कार्यवाही होता कामा नये, अशी चेतावणीही आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकला दिली आहे.