राज्यात कोरोनासंदर्भातील सर्व समस्यांचे निवारण केले आहे ! – शासनाचे उच्च न्यायालयाला निवेदन
|
पणजी, १० जून (वार्ता.)- राज्यशासनाने कोरोना व्यवस्थापनासंदर्भातील सर्व अडचणी प्रशासनाद्वारे सोडवल्या आहेत, अशी माहिती मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाला १० जून या दिवशी शासनाकडून देण्यात आली. स्वयंसेवी संस्था, समाजातील व्यक्ती, तसेच दक्षिण गोवा अधिवक्ता संघटनेकडून राज्यातील कोरोना परिस्थितीविषयी न्यायालयाच्या हस्तक्षेपाची मागणी करणार्या ५-६ वेगवेगळ्या याचिका न्यायालयात प्रविष्ट झाल्या होत्या. त्यांवर सुनावणी करतांना खंडपिठाने न्यायालयाने हस्तक्षेप करण्याची आवश्यकता असलेल्या सर्व सूत्रांची सारणी सिद्ध करण्यासाठी सर्व याचिकाकर्त्यांना अपापसांत समन्वय साधण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर शासनाकडून हे निवेदन सादर करण्यात आले. या सुनावणीच्या वेळी महाधिवक्ता देवीदास पांगम म्हणाले की, याचिकाकर्ते आणि न्यायालय यांनी उपस्थित केलेल्या सर्व समस्यांची राज्यशासनाने नोंद घेतली आहे. पुढील सुनावणी १४ जून या दिवशी होणार आहे.