कोरोनाकाळात अनाथ झालेल्या बालकांच्या अनुषंगाने कोणत्याही आर्थिक भूलथापांना बळी पडू नये ! – विनित म्हात्रे, महिला आणि बालविकास अधिकारी
सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – कोरोनाच्या कालावधीत दोन्ही पालक गमावलेल्या अनाथ बालकांविषयी ‘व्हॉट्सअॅप’, तसेच अन्य प्रसारमाध्यमे यांद्वारे प्रसिद्ध होणार्या कोणत्याही आर्थिक भूलथापांना बळी पडू नये. याविषयी कोणतेही मार्गदर्शन अथवा साहाय्य अपेक्षित असल्यास जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी कार्यालयाशी ०२३६२- २२८८६९ या दूरभाष क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी विनीत म्हात्रे यांनी केले आहे.
कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या अनाथ बालकांची काळजी आणि संरक्षण यांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. अशा बालकांविषयी काही माहिती उपलब्ध असल्यास अथवा अशा प्रकारची बालके आढळून आल्यास या बालकांच्या भविष्यकालीन पुनर्वसनाच्या दृष्टीने जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी कार्यालय येथे संपर्क साधावा, असे आवाहन म्हात्रे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.