विनावापर असलेल्या रुग्णवाहिका अखेर आरोग्य विभागाला सुपुर्द
सिंधुदुर्ग – कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर खनिकर्म विभागाकडून जिल्ह्यासाठी एकूण १२ रुग्णवाहिका देण्यात आल्या होत्या. त्यांपैकी ६ रुग्णवाहिका यापूर्वी विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांना देण्यात आल्या आहेत, तर उर्वरित ६ रुग्णवाहिका विनावापर ठेवण्यात आल्या होत्या. या ६ रुग्णवाहिका ९ जून या दिवशी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे सुपुर्द करण्यात आल्या. पालकमंत्री उदय सामंत यांनी ऑनलाईन पद्धतीने या रुग्णवाहिकांचे लोकार्पण केले, तर जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा शिवसेनेचे नेते सतीश सावंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले. (सध्या कोरोना महामारीमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीस आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा ‘रेड झोन’मध्ये असून दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहेत. यातच खासगी रुग्णवाहिकांकडून सर्वसामान्य जनतेची लूट केली जात असल्याचा आरोप होत असतांना शासकीय रुग्णवाहिका जनतेच्या सेवेत त्वरित उपलब्ध न होणे, हे प्रशासनाच्या दायित्वशून्यतेचे लक्षण नव्हे का ? – संपादक)
गेले काही दिवस या ६ रुग्णवाहिका जिल्हा मुख्यालयाच्या परिसरात उभ्या करून ठेवल्या होत्या. जिल्ह्यात विविध ठिकाणी रुग्णवाहिकांची आवश्यकता असतांना केवळ श्रेय घेण्यासाठी पालकमंत्र्यांनी या रुग्णवाहिका अडवून ठेवल्याचा आरोप करत भाजपच्या पदाधिकार्यांनी जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले होते.
‘धूळ खात पडलेल्या रुग्णवाहिका आजच्या आज संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रांना दिल्या गेल्या नाहीत, तर अधिकार्यांना त्यांच्या कार्यालयात बसू देणार नाही’, अशी चेतावणी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा भाजपचे गटनेते रणजित देसाई यांनी ९ जून या दिवशी दिली होती.