गोव्यात ‘टिका (लसीकरण) उत्सव ३’ चालू करणार ! मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
पणजी, ९ जून (वार्ता.) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील १८ ते ४४ वर्षे वयोगटातील सर्व नागरिकांना लस देण्याविषयी घोषणा केल्याच्या पार्श्वभूमीवर गोवा शासनाने ८ जून या दिवशी गोव्यात ‘टिका (लसीकरण) उत्सव ३’ चालू करण्याची घोषणा केली आहे. याविषयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पत्रकारांना म्हणाले, ‘‘राज्यातील १८ ते ४४ वर्षे वयोगटातील अधिकाधिक लोकांचे लसीकरण करण्यासाठी राज्यात सर्वत्र ‘टिका उत्सव ३’ चालू करण्यात येणार आहे. यामुळे आम्हाला १८ ते ४४ वर्षे वयोगटातील सर्वांना लस देता येईल. मागच्या टिका उत्सवात लोकांचा चांगला प्रतिसाद होता, हे आम्ही अनुभवले आहे. जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत असतांना विरोधी पक्ष ‘टिका उत्सवा’वर अनावश्यक टीका करत आहेत.’’
यापूर्वी ग्रामपंचायत आणि नगरपालिका यांच्या साहाय्याने शासनाने २ वेळा टिका उत्सव हा उपक्रम राज्यात राबवला होता. मुख्यमंत्र्यांनी ‘टिका उत्सव ३’ कधीपासून चालू करणार, हे अद्याप घोषित केलेले नाही.