१९ जुलैपर्यंत गोवा विधानसभेत संपूर्ण अर्थसंकल्प पारित केला जाईल ! -मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
पणजी, ९ जून (वार्ता.)- १९ जुलै २०२१ पर्यंत गोवा विधासभेत संपूर्ण अर्थसंकल्प पारित केला जाईल, असे वक्तव्य मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. ते म्हणाले, ‘‘सध्या आम्ही हंगामी अर्थसंकल्पानुसार (लेखानुदान) व्यवहार जुळवून घेत आहोत. त्याला मर्यादा आहेत. जेव्हा अर्थसंकल्प पूर्णतः पारित केला जाईल, तेव्हा आर्थिक स्थितीशी निगडित प्रश्न सुटतील.’’ अर्थखात्याकडे प्रलंबित राहिलेल्या धारिकांवरून वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी संताप व्यक्त केला होता. त्याविषयी ते म्हणाले, ‘‘कदाचित काही नियमांनुसार त्या धारिका प्रलंबित असतील. सध्या हंगामी अर्थसंकल्प असल्याने असे घडले आहे. या प्रश्नाविषयी काब्राल माझ्याशी काही बोलले नाहीत. मी त्या विषयाकडे लक्ष देईन.’’