धुळे येथे हिंदूंसाठी अत्याधुनिक सुविधा असलेले १०० खाटांचे कोरोना अलगीकरण आणि विलगीकरण केंद्र !  

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा स्तुत्य उपक्रम !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने सिद्ध केलेली शववाहिनी

धुळे, ९ जून (वार्ता.) – कोरोनाची भीषण परिस्थिती लक्षात घेऊन श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, धुळे जिल्ह्याच्या वतीने जनसेवार्थ १०० खाटांचे कोरोना विलगीकरण आणि अलगीकरण केंद्र गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर विनामूल्य चालू करण्यात आले. श्री शिवप्रतिष्ठानच्या वतीने जनसेवार्थ ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर रुग्णवाहिका आणि कोरोना मृतांसाठी विनामूल्य शववाहिनी (स्वर्गरथ) चालू करण्यात आली.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने सिद्ध केलेली रुग्णवाहिका

या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धुळे जिल्हाप्रमुख श्री. संजय शर्मा म्हणाले, ‘‘देश संकटात असतांना समाजसेवेसाठी उभे रहाण्याची प्रेरणा आम्हाला श्रीशिवछत्रपती संभाजी महाराज आणि गुरुवर्य पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्याकडूनच मिळाली. त्यानुसार आम्ही सर्व धुळेकर धारकरी बंधूंनी हे केंद्र चालू करण्याचा निर्णय घेतला. या एक मासाच्या काळात १०० हून अधिक रुग्णांनी केंद्रावर यशस्वी उपचाराचा लाभ घेतला. केंद्रावरील आनंदी वातावरण, अ‍ॅलोपॅथी आणि आयुर्वेदीय उपचार, आध्यात्मिक उपक्रम, रुग्णाच्या मनोरंजनासाठी असलेले दूरदर्शन संच आणि बैठ्या खेळांची सुविधा यांद्वारे रुग्ण लवकर बरे होऊन घरी जात आहेत. तरी सर्व हिंदु बांधवांनी कोरोनाची लक्षणे असल्यास वेळ न घालवता त्वरित केंद्रावर येऊन उपचार करून घ्यावेत. गरजूंनी रुग्णवाहिका सेवेचा लाभ घ्यावा.’’