पू. (श्रीमती) माईणकरआजींची सेवा केल्याने कु. गुलाबी धुरी यांचे स्वभावदोष न्यून होऊन त्यांच्यात झालेली गुणवृद्धी
‘पू. माईणकरआजींची सेवा करण्याची मला संधी मिळाली. त्यांची सेवा करतांना माझ्यातील स्वभावदोष न्यून होऊन माझ्यात गुणवृद्धी झाली. त्याविषयी येथे लिहून दिले आहे.
१. व्यवस्थितपणा
पू. आजींना त्यांचे केस व्यवस्थित विंचरलेले आवडायचे. खोलीतील भांडी एकात एक घालून ठेवलेली आवडायची. उपायांसाठीचे खोके व्यवस्थित ठेवणे आणि गादीवरील चादर व्यवस्थित करणे, अशा सेवा त्यांना मला पुनःपुन्हा सांगायला नको, यासाठी मी या सेवा स्वतःहूनच करू लागले. त्यामुळे माझ्यात व्यवस्थितपणा हा गुण वाढला.
२. सेवांचे नियोजन करून सेवा केल्यामुळे तत्परता हा गुण वाढणे
पू. माईणकरआजी जाग्या असतांना त्यांची नखे कापणे, औषधे संपण्याअगोदरच मागवणे, पू. आजी झोपल्यावर इतर सेवा करणे, असे मी सेवांचे नियोजन केले. त्यामुळे माझ्यातील चालढकलपणा हळूहळू न्यून होऊन माझ्यात तत्परता हा गुण वाढला.
३. सतर्कता
पू. माईणकरआजींना चाकाच्या खुर्चीवर बसवतांना खुर्चीचा ‘स्टॉपर’ लावला आहे ना ? हे सतर्कतेने बघणे, ‘रात्री त्या व्यवस्थित झोपल्या आहेत ना ?’, याकडे लक्ष ठेवणे यांमुळे माझ्यात सतर्कता वाढली.
४. इतरांचा विचार करणे
पू. आजी झोपलेल्या असतांना आवाज न करता सेवा करणे, पू. आजींना न्याहारी आणतांना त्यांच्या खोलीतील साधिकांनाही न्याहारी आणणे, पू. आजींचे कपडे वाळत घातल्यावर खोलीतील साधिकांचे कपडे वाळले असतील, तर ते खोलीत आणणे, खोलीतील साधिकांना बरे नसतांना खोलीतील सेवा करणे यांमुळे माझ्यातील आत्मकेंद्रितपणा न्यून होत गेला आणि इतरांचा विचार होऊ लागला.
५. व्यापकता
मी करत असलेले भाववृद्धीचे प्रयत्न इतरांना सांगणे, नवीन प्रार्थना सुचल्यास ती इतरांना सांगणे, एकमेकांना चुका सांगून साहाय्य करणे, असे प्रयत्न केल्याने माझ्यातील प्रतिमा जपणे आणि संकुचितपणा यांसारखे स्वभावदोष अन् अहं न्यून होऊन माझ्यात व्यापकत्व वाढले.
६. वर्तमानकाळात राहून सेवा करणे
मी अन्य सेवा करत असतांना पू. आजींनी बोलावल्यावर सेवा बाजूला ठेवून पू. आजींकडे जावे लागायचे. तेव्हा माझ्या मनाचा पुष्कळ संघर्ष व्हायचा; परंतु आता सर्व स्वीकारता येऊ लागले आहे. अशा प्रसंगांमुळे वर्तमानकाळात राहून सेवा करण्याचा भाग वाढला.
७. शरणागतभावाने प्रार्थना होणे
‘गुरुदेवा, मी संतसेवा करण्यास पात्र नाही. तुम्हीच मला सेवा करण्याची बुद्धी, शक्ती आणि कौशल्य द्या. मी तुम्हाला शरण आले आहे’, अशी माझ्याकडून दिवसातून अनेक वेळा शरणागतभावाने प्रार्थना होते.
८. गुरूंचे स्मरण होणे
मला पूर्वी गुरूंचे स्मरण करण्यासाठी विशिष्ट प्रयत्न करावे लागत होते; परंतु आता संतसेवा करतांना गुरूंचे स्मरण एवढे वाढले आहे की, ‘त्यांना विसरणे अशक्य आहे’, असे मला वाटते.
९. पू. आजींकडून पुष्कळ चैतन्यशक्ती मिळणे आणि ‘त्याच सेवा करवून घेत आहेत’, असे जाणवणे
पूर्वी काही वेळा मला निराशा यायची; परंतु पू. आजींच्या सेवेत आल्यापासून मला कितीही सेवा करायला सांगितली, तरी ती सेवा करण्याची माझ्या मनाची सिद्धता असते. सेवा करतांनाही आनंद मिळतो. ‘पू. आजींकडून पुष्कळ चैतन्य आणि शक्ती मिळायची अन् त्याच माझ्याकडून सेवा करवून घेत आहेत’, असे मला वाटते.
‘गुरुदेवा, संतसेवेत भाववृद्धीचे प्रयत्न करून घेतांना तुम्हीच माझा अहंकार अल्प केलात. तुम्हीच माझ्यामध्ये गुणवृद्धी केलीत. यासाठी तुमच्या चरणी कृतज्ञतारूपी शब्द आणि प्रयत्न अर्पण केले आहेत.’
– कु. गुलाबी धुरी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.२.२०२१)