मुंबईतील अनेक भागांत रस्त्यांवर पाणी साचून वाहतूक ठप्प, तर सखल भागांतील घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल !
|
मुंबई – ८ जूनच्या मध्यरात्रीपासून आणि ९ जून या दिवशी सकाळी झालेल्या पहिल्याच मुसळधार पावसामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचून मुंबईची झालेली दूरवस्था पहायला मिळाली. ८ जूनच्या रात्रीपासून चालू झालेला मुसळधार पावसानेच शहरातील विविध भागांत पाणी तुंबले होते. हिंदमाता, किंग्ज सर्कल, शीव येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला.
१. चेंबूर येथील पोस्टल कॉलनीसह अन्य ठिकाणी सखल भागांतील रस्त्यांवरील पाणी घरांमध्ये शिरल्यामुळे नागरिकांना पुष्कळ त्रास सहन करावा लागला.
२. मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून १०४ टक्के नालेस्वच्छता झाल्याचे सांगण्यात आले होते; मात्र पावसाच्या पहिल्याच फटक्यात मुंबईतील रस्त्यांची दूरवस्था झाल्याचे दिसत होते. (ही आहे प्रशासनाची हतबलता ! – संपादक)
शीव रेल्वेस्थानकाला तलावाचे स्वरूप !
शीव रेल्वेस्थानकावर पुष्कळ पाणी साचल्याने रेल्वेस्थानकाला तलावाचे स्वरूप आले होते. त्या पाण्याचा निचरा करण्यासाठी कर्मचार्यांची धावपळ झाली. त्यानंतर चुनाभट्टी ते वाशी ही हार्बर रेल्वेमार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्षात जाऊन घेतला मुंबईच्या परिस्थितीचा आढावा
मुंबई – शहरात पडत असलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ९ जून या दिवशी दुपारी ३.१० वाजता मुंबई महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्षात भेट दिली. या वेळी उद्धव ठाकरे यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक घेऊन सर्व यंत्रणेला सतर्क रहाण्यास सांगितले. पावसाची परिस्थिती हाताळतांना कोरोनाच्या रुग्णसेवेत कोणत्याही प्रकारे अडथळा होणार नाही, याची दक्षता घेण्यास त्यांनी सांगितले.
मुंबईसह कोकण किनारपट्टीत ‘रेड अलर्ट’ घोषित !
मुंबई – हवामान विभागाने पुढचे ४ दिवस मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टीत ‘रेड अलर्ट’ घोषित करण्यात आला आहे.
मिठी नदीच्या काठावरील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हालवले !
मुंबईतील मिठी नदी पहिल्याच पावसात तुडुंब भरून वाहू लागल्याने नदीच्या परिसरातील घरांमध्ये नदीचे पाणी शिरले. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव मिठी नदीच्या परिसरातील क्रांतीनगर येथील अनेक कुटुंबांना अन्यत्र स्थलांतरित करण्यात आले आहे.