सनातनचे १०७ वे समष्टी संत पू. डॉ. नंदकिशोर वेद यांचे आजारपण अन् देहत्याग या वेळी ‘योगक्षेमं वहाम्यहम् ।’ या वचनाची पदोपदी आलेली अनुभूती !
सनातनचे १०७ वे समष्टी संत पू. डॉ. नंदकिशोर वेद यांचा परात्पर गुरु डॉक्टरांप्रती असलेला कृतज्ञताभाव आणि गुरुदेवांच्या अपार कृपेमुळे त्यांचे आजारपण अन् देहत्याग या वेळी भगवान श्रीकृष्णाच्या ‘योगक्षेमं वहाम्यहम् ।’ या वचनाची पदोपदी आलेली अनुभूती !
वैशाख अमावास्या (१० जून २०२१) या दिवशी पू. डॉ. नंदकिशोर वेद यांचे मासिक श्राद्ध आहे. त्या निमित्ताने …
पू. डॉ. नंदकिशोर वेद यांनी ११.५.२०२१ या दिवशी रामनाथी आश्रमात देहत्याग केला. वैशाख अमावास्या (१०.६.२०२१) या दिवशी त्यांचे मासिक श्राद्ध आहे. त्या निमित्ताने त्यांची धाकटी कन्या सौ. क्षिप्रा जुवेकर यांनी उलगडलेला त्यांचा जीवनपट, त्यांची वैशिष्ट्ये, तसेच वडिलांचे आजारपण आणि त्यांचा देहत्याग या वेळी अनुभवलेली संपूर्ण गुरुकृपा यांविषयीची सूत्रे येथे दिली आहेत.
१. वडिलांचे सर्व कुटुंबियांवर असलेले पितृछत्र
१ अ. वडिलांनी ‘प्रत्येक नाते कसे निभवायचे’, हे प्रत्यक्ष कृतीतून दाखवणे आणि नेहमी निरपेक्ष अन् स्पष्ट मार्गदर्शन करणे : ‘माझ्या वडिलांच्या जीवनाचा विचार केला, तर पहिल्यापासूनच ‘प्रत्येक नाते कसे निभवायचे असते’, हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवले. त्यांना कुणाचेही मार्गदर्शन नव्हते; परंतु प्रत्येक वेळी ते योग्यच निर्णय घ्यायचे. ते सदैव निरपेक्ष आणि स्पष्टपणे मार्गदर्शन करायचे अन् तशीच कृतीही करायचे. आम्ही सर्वजण वर्ष १९९९ पर्यंत एकत्र कुटुंबात रहात होतो. त्या वेळी वडिलांनी त्यांच्या भावांच्या मुलांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले. जेव्हा उन्हाळ्याची सुटी असायची, तेव्हा मुलांचा अभ्यास व्हायला पाहिजे, यासाठी ते स्वतः प्रश्नपत्रिका सिद्ध करायचे आणि त्यांच्याकडून प्रश्नपत्रिका सोडवून घ्यायचे. मुलांकडून अभ्यास करून घेण्यासाठी ते वेळ देत होते. कुणाला एखादा प्रकल्प (प्रोजेक्ट) बनवायचा असेल, तर वडील त्याला साहाय्य करून तो बनवून द्यायचे.
१ आ. वडिलांनी शिस्त आणि प्रेम यांची सांगड घालणे अन् त्यांच्या आदर्श कृतींमुळे सर्वांना त्यांचा आधार वाटणे : वडील घरातील सर्व मुलांसाठी चॉकलेट, खेळणी इत्यादी आणायचे. ते कधी अयोध्येच्या बाहेर गेले, तर एकत्र कुटुंबात अनेक मुले असूनसुद्धा सर्वांसाठी काही ना काहीतरी घेऊन यायचे. ते घरातील सर्व मुलांवर निरपेक्ष प्रेम करत असल्यामुळे सर्व जण त्यांचा पुष्कळ आदर करायचे. वडील जेवढे प्रेमळ होते, तेवढी त्यांची शिस्तही होती. वडिलांचे त्या सर्वांशी प्रत्यक्ष बोलणे फारसे झाले नाही, तरी त्यांच्या आदर्श कृतींमुळे सर्वांना त्यांचा आधार वाटायचा.
१ इ. वडिलांच्या देहत्यागाच्या वार्तेमुळे परिचित आणि नातेवाईक यांना अतिशय दुःख होऊन त्यांना वडिलांनी दिलेल्या प्रेमाची आठवण होणे : वडिलांच्या देहत्यागाची वार्ता कळल्यावर वडिलांच्या परिचयातील वृद्ध, युवा, तसेच लहान मुले, असे सर्वजण त्यांना अतिशय दु:ख झाल्याचे सांगू लागले आणि वडिलांनी ‘त्या सर्वांना किती प्रेम दिले होते’, याची आठवण काढू लागले. माझी मावस भावंडे सांगू लागली, ‘वडिलांनी त्यांना किती प्रेम दिले. त्यांच्या प्रेमामुळे ती सुटीत आमच्या घरी २ – ३ मास रहायची.’
२. विद्येचा बाजार न मांडता ती खर्या अर्थाने ‘दान’ करणार्या वडिलांनी अनेक विद्यार्थ्यांना ‘पी.एच् डी.’साठी सर्व प्रकारे मार्गदर्शन करून कुणाकडून कधी १ रुपयाही न घेणे
वडिलांनी प्रतिदिन १५ ते १६ घंटे अभ्यास करून स्वतःचे शिक्षण पूर्ण केले होते. त्यांनी त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी अत्यंत प्रामाणिकपणे काम केले. त्यामुळे त्यांचे विद्यार्थी अजूनही त्यांचा आदर करतात. ते वडिलांच्या संपर्कात राहून त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यायचे. वडिलांनी अनेक विद्यार्थ्यांना ‘पी.एच् डी.’साठी साहाय्य केले होते. तेव्हा पूर्ण ४ वर्षे वडील त्या विद्यार्थ्याच्या संशोधन कार्यात १०० टक्के असे सहभागी व्हायचे की, जणू त्यांचे स्वतःचेच संशोधन आहे. ते संशोधनासाठी स्वतः परिश्रम, उदा. अनेक पुस्तकांचे वाचन करणे, माहिती गोळा करणे, वर्तमानपत्रातील कात्रणे काढणे इत्यादी गोष्टी स्वतःच करायचे. त्यांच्या कृतीने प्रेरित होऊन विद्यार्थीसुद्धा परिश्रम घ्यायचे.
‘पी.एच् डी.’साठी मार्गदर्शन करणारे अन्य प्राध्यापक संशोधन करणार्यांकडून सहस्रो रुपये घेतात. त्यांना जुन्या अन्य संशोधन कार्याची माहितीच ‘कॉपी’ करायला सांगतात; परंतु वडील या सगळ्याच्या विरुद्ध होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत जवळजवळ ८ विद्यार्थ्यांनी ‘पी.एच् डी.’ केली आहे. वडिलांनी प्रत्येक विद्यार्थ्यासाठी कष्ट घेतले आणि त्यांच्याकडून कधी एक रुपयाही घेतला नाही. कुणी भेटस्वरूपात काही देण्याची इच्छा व्यक्त केली, तरी ते स्वीकारायचे नाहीत. यामुळेच दूर दूर अंतरावरून विद्यार्थी त्यांच्याकडे मार्गदर्शन घेण्यासाठी यायचे.
३. वडिलांची शारीरिक वैशिष्ट्ये
लहानपणापासून मला माझ्या वडिलांची त्वचा पाहून पुष्कळ कुतूहल असायचे की, त्यांची त्वचा एवढी मऊ मुलायम कशी आहे ? त्यांची नखे अगदी स्वच्छ आणि एकदम पांढरी अन् चमकदार असायची.
४. आजारपणातही सर्व कृतीतून व्यवस्थितपणा दिसून येणे
वडिलांमध्ये एवढा व्यवस्थितपणा होता की, त्यांच्या रक्तातील ‘प्लेटलेटस्’ ८ सहस्र एवढ्या अत्यल्प असूनही ते सकाळी तोंड धुणे, भोजनापूर्वी हात धुणे इत्यादी सर्व कृती व्यवस्थित करायचे.
५. परात्पर गुरु डॉक्टरांचा जन्मोत्सव वैशाख मासात न करता चैत्र मासात करण्याचे भगवंताचे नियोजन आणि त्यामागील कार्यकारणभाव !
५ अ. कार्यक्रमात परात्पर गुरु डॉक्टरांच्या साधकांशी पूर्वी झालेल्या सत्संगाचे चलत्चित्र दाखवले जाणे, त्यात श्री गुरूंनी वडिलांना दिलेल्या निरोपातून ऊर्जा देऊन कृपा करणे आणि त्यामुळे पुढे येणारे सर्व प्रसंग सहन करण्याची शक्ती मिळणे : ९.५.२०२१ या दिवशीच्या परात्पर गुरु डॉक्टरांच्या जन्मोत्सवानिमित्त झालेल्या सोहळ्यात सर्व साधकांना परात्पर गुरु डॉक्टरांच्या साधकांसमवेत पूर्वी झालेल्या सत्संगाचे चलत्चित्र (‘व्हिडिओ’) दाखवण्यात आले. त्या सत्संगाला वडिलही उपस्थित होते. त्या वेळी ‘परात्पर गुरु डॉक्टरांचे आम्हा सर्वांवर किती लक्ष आहे !’, असे लक्षात येऊन मला श्री गुरूंच्या प्रती अत्यंत कृतज्ञता वाटली. मला वडिलांविषयी अतिशय जिव्हाळा होता. त्यामुळे त्यांच्या संदर्भात मी पुष्कळ संवेदनशील आहे. त्यांचे आजारपण आणि शारीरिक त्रास यांविषयी मला पुष्कळ काळजी वाटायची. त्या चलत्चित्रात (‘व्हिडिओ’त) श्री गुरूंनी दोन वेळा सांगितले, ‘‘क्षिप्राला सांगा, वडिलांची प्रगती होत आहे.’’ श्री गुरूंनी म्हटलेले हे वाक्य माझ्यासाठी केवळ वाक्य नव्हते, तर त्यातून त्यांनी मला ऊर्जा दिली. त्यांनी माझ्यावर कृपा केली आणि पुढे येणारे सर्व प्रसंग सहन करण्याची शक्तीही दिली.
५ आ. ‘भक्ताचे नियोजन ईश्वरच करून ठेवतो’, या सद्गुरु डॉ. पिंगळेकाकांच्या वाक्याची आलेली प्रचीती !
५ आ १. परात्पर गुरुदेवांचा जन्म वैशाख मासात झाला असूनही महर्षींनी त्यांचा जन्मोत्सव चैत्र मासात करायला सांगण्यामागे ‘वडिलांना चैतन्य मिळावे’, हा हेतू असावा’, असे मनात येणे : सोहळा पाहिल्यावर माझ्या लक्षात आले, ‘दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये आले होते की, परात्पर गुरुदेवांचा जन्म वैशाख मासात झाला असूनही महर्षींनी जन्मोत्सव चैत्र मासात करायला सांगितला. तेव्हा मला वाटले की, वडिलांना चैतन्य द्यायचे होते. कदाचित् जून मासापर्यंत त्यांची स्थिती आणखी बिघडली असती. त्यामुळे परात्पर गुरुदेवांनी आम्हा सर्वांसाठी महर्षींच्या माध्यमातून हे नियोजन केले होते. तेव्हा सद्गुरु पिंगळेकाकांनी म्हटलेले ‘सामान्य व्यक्ती स्वतःचे नियोजन स्वतःच करते.’ हे वाक्य मला आठवले.
५ आ २. आजारपणात सद्गुरु पिंगळेकाका घेत असलेला भावसत्संग वडिलांसाठी जीवनदायी असणे, प्रकृती ठीक नसूनही त्यांनी सत्संगातील भावपूर्ण सूत्रे लिहून पाठवणे आणि त्यात ‘भक्ताचे नियोजन ईश्वर करून ठेवतो’, असे वाक्य असणे : रामनाथी आश्रमात असतांना वडिलांना आजारपणामुळे खोलीबाहेर जाता यायचे नाही. तेव्हा कृतिकाताई खत्रीने वडिलांना प्रतिदिन सकाळी सद्गुरु पिंगळेकाका घेत असलेल्या ‘ऑनलाईन’ भावसत्संगाला जोडून घेतले होते. हा भावसत्संग त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि जीवनदायी (म्हणजे भगवंतानेच त्यांना श्वास दिले.) झाला होता. त्यांची प्रकृती ठीक नसूनही ते आम्हाला सुंदर आणि भावपूर्ण सूत्रे लिहून पाठवायचे. त्या सूत्रांमधील काही सूत्रे पुढीलप्रमाणे होती, ‘साधकाला आपले नियोजन स्वतःच करावे लागते. शिष्याचे नियोजन गुरु स्वतः करतात आणि भक्ताचे नियोजन ईश्वरच करून ठेवतो.
५ इ. सोहळा पाहून वडिलांना आनंद होणे आणि त्यांना हा आनंद देण्याचे नियोजन परात्पर गुरुदेवांच्या कृपेने झाल्याचे लक्षात येणे : ९.५.२०२१ या दिवशीचा सोहळा पाहून वडिलांना अतिशय आनंद झाला आणि समाधान मिळाले. ‘त्यांना हा आनंद देण्याचे नियोजन परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळे झाले आहे’, हे माझ्या लक्षात आले.
६. अंतसमयी वडिलांचे दर्शन घेता यावे, याचे भगवंताने केलेले नियोजन !
६ अ. अयोध्येहून गोव्याला येतांना प्रकृती बिघडणे, सद्गुरु जाधवकाकांनी त्वरित गोव्याला जाण्याचा निरोप दिल्यावर शरिरात शक्ती येणे : आणखी एका प्रसंगावरून वाटले की, वडिलांना शेवटच्या क्षणी पहाणे आणि त्यांना भेटण्याची संधी मिळणे, हेही भगवंताचेच नियोजन होते. वडिलांना भेटण्यासाठी रामनाथी आश्रमात यावे; म्हणून माझी मोठी बहीण सौ. कनुप्रिया, तिची २ लहान मुले आणि मी अन् प्रशांत अशी आम्हा सर्वांची तिकिटे काढली. प्रवासाच्या एक दिवस आधी माझी प्रकृती बिघडली. त्यामुळे सद्गुरु जाधवकाकांना ही परिस्थिती सांगितली. तेव्हा ते म्हणाले, ‘‘आपण त्वरित निघा.’’ त्यांचे बोलणे ऐकताच माझ्या संपूर्ण शरिरात जणू शक्ती आली. पहिल्यांदाच संघर्ष करून आम्ही सर्वजण गोव्याला पोचलो.
६ आ. ‘ऑक्सिजन’वर असलेल्या वडिलांची भेट ! : ११.५.२०२१ या दिवशी आम्ही आश्रमात वडिलांना भेटलो. त्या वेळी ते ‘ऑक्सिजन’वर होते. ते बोलू शकत नव्हते, तरीही पूर्ण शक्ती एकवटून थोडे शब्द बोलू शकले. त्यांच्या बोलण्यातून जे काही समजले, त्यानुसार आम्ही कृती करत होतो. संपूर्ण परिवार त्यांना भेटू शकला. त्यांनी आम्हा सर्वांना पाहिले आणि लहान मुलांना आशीर्वाद दिला. ते जे काही बोलले, त्यातही त्यांनी परात्पर गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त केली. आम्हाला भेटतांनासुद्धा त्यांचे हात नमस्काराच्या मुद्रेत जोडलेले होते.
६ इ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांनी दर्शन देऊन वडिलांना कृृतार्थ आणि आश्वस्त केल्याचा क्षण अन् कृतज्ञतेच्या अश्रूरूपात वडिलांनी त्यांना दिलेला भावपूर्ण प्रतिसाद ! : त्या वेळी त्यांना भेटायला स्वतः देवी मां (श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई) तेथे आली. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंनी दर्शन देऊन वडिलांना कृृतार्थ केले. त्या वडिलांशी बोलत होत्या. तेव्हा वडिलांनी डोळ्यांची हळूच उघडझाप करून त्यांना प्रतिसाद दिला. देवीमातेने दोन फुले आणली होती. त्यांनी सांगितले, ‘‘येथे खोलीत येण्यापूर्वी त्यांनी वडिलांसाठी गुरुपादुकांना प्रार्थना केली. त्याच वेळी एक कमलपुष्प खाली पडले, ज्याचा अर्थ आहे की, वडिलांवर पूर्णपणे गुरुकृपा आहे. यातून ‘ते गुरुचरणीच आहेत’, असे परात्पर गुरुदेवांनी आश्वस्त केले आहे.’’ त्यांच्याकडे आश्रमातील चैतन्यदायी सिद्धिविनायक मंदिराच्या पूजेतील एक फूलसुद्धा होते. देवीमातेने दोन्ही फुले वडिलांच्या उशीच्या दोन्ही बाजूंना ठेवली आणि वडिलांच्या डाव्या मनगटावर तिरुपति बालाजीचा धागा बांधला.
माझ्याजवळ कृतज्ञतेसाठी शब्दच नाहीत. अशा स्थितीतही वडिलांच्या डोळ्यांतून अखंड कृतज्ञतेचे अश्रू वाहू लागले. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंनी सांगितले, ‘‘वडिलांकडे बघून पुष्कळ चांगले वाटते. ‘त्यांच्या सभोवती शीतल कवच आहे’, असे अनुभवायला येत आहे. त्यांची त्वचाही पिवळी होत आहे, तसेच त्यांनी हातांची मुद्राही केली आहे.
७. वडिलांच्या देहत्यागानंतर
७ अ. ‘आई आणि ताई यांना कसे सांभाळावे ?’, अशी काळजी वाटत असतांना श्री गुरूंनी ती काळजीही दूर करणे अन् श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंनी सर्वांना आधार आणि चैतन्य दिल्याने स्थिर रहाता येणे : रात्री ८ च्या सुमारास वडिलांनी आश्रमाच्या चैतन्यदायी आणि सात्त्विक वातावरणात देहत्याग केला अन् त्यांच्या पुढच्या अंतिम प्रवासास आरंभ झाला. त्या वेळी मला एका गोष्टीची काळजी होती, ‘वडिलांचा देहत्याग झाल्यावर आई आणि ताई या दुःखाला कसे तोंड देऊ शकतील ? त्यांना कसे समजावून सांगायचे’; परंतु ही काळजीसुद्धा परात्पर श्री गुरूंनी दूर केली. साक्षात् देवीमातेने (श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंनी) आई आणि ताई यांना सांभाळले, त्यांना आधार अन् चैतन्य दिले. केवळ आणि केवळ त्यांच्या कृपेमुळेच आम्ही सर्वजण स्थिर राहू शकलो.
– गुरुचरणी अर्पण, सौ. क्षिप्रा जुवेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.५.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |