संगीतातील राग ‘मारूबिहाग’ ऐकतांना सौ. प्राची रोहन मेहता यांना आलेली अनुभूती आणि जाणवलेली सूत्रे
नृत्य आणि संगीत यांविषयी अद्वितीय संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय
ईश्वरप्राप्ती करून देणार्या कलांपैकी संगीत ही एक कला आहे. अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताला आध्यात्मिक पाया असल्याने संगीतातूनही साधना करून ईश्वरप्राप्ती करता येते. या संदर्भात रामनाथी आश्रमात होत असलेल्या संगीतकलेच्या प्रयोगांच्या वेळी साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेली अनुभूती पुढे देत आहोत.
१. अनुभूती
१ अ. पुष्कळ दिवसांनी पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजात राग ‘मारूबिहाग’ ऐकल्यावर भावजागृती होणे आणि कृतज्ञता वाटणे : ‘प्रथम प्रयोगाच्या वेळी माझ्या मनाची स्थिती नकारात्मक होती. प्रयोग चालू झाल्यावर ‘हा ‘बिहाग’ राग असावा’, असे मला वाटले. (मी शास्त्रीय संगीताच्या ३ परीक्षा दिल्या आहेत.) पुष्कळ दिवसांनी संगीत ऐकल्यामुळे माझे मन भरून आले आणि हळूहळू माझी भावजागृती होऊ लागली. माझ्या मनात पुष्कळ कृतज्ञता दाटून आली.
१ आ. साधिकेचे मन निर्विचार होणे, त्यानंतर सूर ऐकू येणे बंद होऊन कृतज्ञता वाटून आनंदाशी अनुसंधान होणे, नंतर ‘देवच हवा’, असे वाटणे : हळूहळू माझे मन निर्विचार झाले आणि माझे आनंदाशी अनुसंधान होऊ लागले. तेव्हा मला संगीतामधील सूर ऐकू येणे बंद झाले आणि केवळ कृतज्ञता अन् आनंद जाणवू लागला. त्या वेळी ‘आता केवळ मी आणि श्रीकृष्ण असून अन्य काहीच नाही’, असेच मला जाणवत होते. प्रयोगाचा आरंभ होण्यापूर्वी मी मायेतील विचारांनी त्रासले होते; पण या अनुभूतीनंतर ‘मला आता देवच हवा’, असे वाटले. ‘संपूर्ण जग एका बाजूला आणि माझा श्रीकृष्ण अन् मी एका बाजूला’, असेच मला वाटत होते. प्रयोगानंतर मी कु. तेजलताईला विचारल्यावर तिने तो ‘मारूबिहाग’ राग असल्याचे सांगितले.
२. ‘मारूबिहाग’ रागाविषयी जाणवलेली सूत्रे
अ. मी १५ ते २० दिवस प्रतिदिन ‘मारूबिहाग’ राग ऐकत होते. माझे मन विचलित किंवा नकारात्मक स्थितीत असल्यास हा राग ऐकल्यावर मला लगेच भावावस्थेत जाण्यास साहाय्य व्हायचे.
आ. या रागाने मन शांत होऊन निर्विचार होते अन् भाव लवकर जागृत होतो.
इ. या रागाचा परिणाम अधिकाधिक १ ते २ घंटे असतो. त्यानंतर पुन्हा त्रासात वाढ होते. त्यामुळे संगीताला प्रार्थना, कृतज्ञता अन् नामजप यांची जोड दिली, तर त्यातून आपली चैतन्य ग्रहण करण्याची क्षमता वाढते आणि आपल्याला लाभ होतो.’
– सौ. प्राची रोहन मेहता, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.१०.२०१७)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |