खेड (जिल्हा सातारा) येथील ग्रामसेवकाला लाच घेताना रंगेहात पकडले !
तळागाळातील भ्रष्टाचार बंद होण्यासाठी कठोर कारवाईची आवश्यकता आहे.
सातारा – रस्त्याच्या कामाचे देयक संमत करून धनादेशाच्या मोबदल्यात ६ सहस्र ५०० रुपयांची लाच स्वीकारतांना खेड येथील ग्रामसेवक ज्ञानेश्वर गायकवाड यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.
तक्रारदार हे पोट ठेकेदार आहेत. त्यांनी केलेल्या रस्त्याच्या कामाचे देयक ३ लाख ५० सहस्र रुपये झाले होते. कामाचे देयक संमत करून त्याचा धनादेश तक्रारदार यांना देण्यात आला होता. त्याचा मोबदला म्हणून ३ टक्के दराने ग्रामसेवक गायकवाड यांनी तक्रारदार यांच्याकडे ७ सहस्र ५०० रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती ६ सहस्र ५०० रुपये देण्याचे ठरले. तक्रारदार यांनी सातारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याविषयी तक्रार दिली होती. तक्रारीची पडताळणी केल्यावर त्यामध्ये तथ्य आढळून आले. ८ जून यादिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ग्रामसेवक गायकवाड यांना लाच स्वीकारतांना रंगेहात पकडले.