राज्यातील सर्वांचे लसीकरण झाल्यानंतर पर्यटन व्यवसाय चालू करावा ! – पर्यटनमंत्री मनोहर आजगांवकर
पणजी, ८ जून (वार्ता.)- गोव्यातील संपूर्ण जनतेला कोरोना प्रतिबंधक लस दिल्यानंतरच गोव्यातील पर्यटन व्यवसाय चालू करण्यात यावा, असे मत गोव्याचे पर्यटनमंत्री मनोहर आजगांवकर यांनी व्यक्त केले आहे.
ते म्हणाले, ‘‘शासनाने हॉटेल्स चालू ठेवण्यास अनुमती दिली आहे; परंतु उपाहारगृहे आणि पर्यटन व्यवसायाशी संबंधित इतर उद्योग कोरोनाचा संसर्ग वाढल्याने आणि संचारबंदीमुळे ९ मेपासून बंद आहेत. ज्या पर्यटकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील, त्यांनाच गोव्यात येण्यास अनुमती द्यावी. आर्थिकदृष्ट्या पर्यटन व्यवसाय हा राज्याचा कणा असल्याने आपण पर्यटन व्यवसाय पुष्कळ काळ बंद ठेवू शकत नाही. जेव्हा राज्यातील सर्वांना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस देऊन पूर्ण होतील, तेव्हा आम्ही पर्यटन व्यवसायाशी निगडित सर्व उद्योग चालू करू शकतो. राज्यात पर्यटन व्यवसाय पूर्णपणे चालू झाल्यावर देशांतर्गत पर्यटक गोव्यात येण्याच्या दृष्टीने आम्ही प्रसिद्धीमाध्यमांद्वारे मोठ्या प्रमाणावर मोहीम चालू करू. महामारीमुळे या पर्यटन व्यवसायाला बर्याच प्रमाणात फटका बसला आहे. त्यामुळे या व्यवसायाला पुन्हा गतवैभव प्राप्त झाले पाहिजे. विदेशांतील पर्यटक गोव्यात येण्याच्या दृष्टीने आम्हाला चार्टर्ड विमाने चालू करण्यासंबंधी केंद्राच्या निर्णयावर अवलंबून रहावे लागेल.’’
कोरोनामुळे गेल्या २ वर्षांत पर्यटन विकास महामंडळाची मोठ्या प्रमाणात हानी !
पर्यटन व्यवसाय चालू झाल्याने होणारी हानी अल्प होईल, अशी आशा गोवा पर्यटन विकास महामंडळाने व्यक्त केली आहे. या महामंडळाचे संचालक निखिल देसाई म्हणाले, ‘‘कोरोना महामारीमुळे गेल्या २ वर्षांत महामंडळाची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. आता पर्यटन व्यवसाय चालू होईल, अशी आम्ही आशा बाळगतो. आम्हाला जवळपास ४०० कर्मचार्यांच्या वेतनाचा आर्थिक बोजा सहन करावा लागत आहे.’’