गोव्यात १५ जूनपासून संचारबंदी उठवण्याची प्रक्रिया चालू करणार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पणजी, ८ जून (वार्ता.) – गोवा राज्यात १५ जूनपासून संचारबंदी उठवण्याची (‘अनलॉक’ची) प्रक्रिया चालू करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. त्याचप्रमाणे राज्यातील सर्व लोकांचे लसीकरण केल्यानंतरच आम्ही पर्यटन व्यवसाय चालू करण्याविषयी विचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

१८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांना पहिला डोस ३१ जुलैपर्यंत देण्याचे ध्येय असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, ‘‘आम्ही दुसरा डोस देण्याची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करू. टिका उत्सवाच्या माध्यमातून ४५ वर्षांवरील नागरिकांपैकी ८० टक्के नागरिकांना लसीचा पहिला डोस दिला गेला आहे. १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी आम्ही २१ जून २०२१ पासून ‘टिका उत्सव’ चालू करत असून लवकरच सर्वांना ही लस देऊन लसीकरण पूर्ण करू.

पुढील २ मासांत १०० टक्के लसीकरण पूर्ण होईपर्यंत आम्हाला काळजी घ्यायला हवी. आता रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के असून मृतांची संख्याही अल्प होत आहे.’’

खलाशी आणि विदेशांत जाणारे विद्यार्थी यांना पुढील २८ दिवसांत लसीचा दुसरा डोस देण्याच्या केंद्राच्या निर्णयाची मुख्यमंत्र्यांनी प्रशंसा केली. ते म्हणाले की, राज्यशासनानेही कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा सामना करण्यासाठी सिद्धता चालू केली आहे.